ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : कोलकाताचं ईडन गार्डन आज पुन्हा एकदा विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने दणाणून निघाले. २४ डिसेंबर २००९ मध्ये विराटने वन डे क्रिकेटमधील पहिले शतकच याच ऐतिहासिक मैदानावर झळकावले होते आणि आज १४ वर्षानंतर त्याने विश्वविक्रमी ४९वे शतक झळकावले. विराटने यासह सचिन तेंडुलकरच्या वन डेतील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी स्टेडियमवरील उपस्थित सर्वांनी आपले मोबाईल उंचावले होते. ७० हजार प्रेक्षकांच्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये विराटने झळकावलेले शतक खूप भावनिक राहिले.
‘बार बार दिन ये आये…’, वाढदिवशी ‘विराट’ शतक, सचिनच्या विश्वविक्रमाच्या बरोबरीसह अनेक पराक्रम
दोन वेळा शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतल्यानंतर अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) वाढदिवशी ऐतिहासिक ४९वे शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटने १२१ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. वाढदिवशी शतक झळकावून विराटने आणखी एक पराक्रम केला. वाढदिवसाला वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट हा जगातील सातवा आणि तिसरा भारतीय ठरला. १९९३ मध्ये विनोद कांबळीने नाबाद १०० ( वि. इंग्लंड), सचिन तेंडुलकर १३४ ( वि. ऑस्ट्रेलिया, १९९८) यांनी वाढदिवसाला शतक झळकावले आहे.