ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली आहे. आज याच दोन संघांमध्ये कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर सामना होतोय. साखळी फेरीत अव्वल कोण, याची स्पर्धा आता दोन संघांमध्ये सुरू झालीय... त्यात विराट कोहलीच्या वाढदिवसालाच हा सामना असल्याने सारेच उत्सुक आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा फलंदाजीला उतरला आहे.
रोहितने २०१४ मध्ये वन डे क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम २६४ धावांची ( वि. श्रीलंका) वैयक्तिक खेळी इथेच केली होती. कसोटी पदार्पणही इथेच झाले आणि वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने १७७ धावा चोपल्या होत्या. या मैदानावर रोहितला फलंदाजी करायला नेहमी आवडते आणि आजही त्याने तिसरा चेंडू पदलालित्य दाखवून चौकार पाठवला. त्याने मारलेले पुल शॉट नेत्रदिपक राहिले. वर्ल्ड कप स्पर्धेत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक २३१ धावा रोहितने केल्या आहेत. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने ४.३ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या आणि वर्ल्ड कपमधील ही एखाद्या संघाची दुसरी जलद हाफ सेंच्युरी ठरली. ऑस्ट्रेलियाने ४.१ षटकांत न्युझीलंविरुद्ध पन्नास धावा केल्या होत्या.