Join us  

प्रतीक्षा संपली! विराट कोहलीचे ४९वे शतक, सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : सर्वांना प्रतीक्षा होती ती विराटच्या ४९व्या शतकाची. मागील दोन सामन्यांत ( ८८ व ९५) त्याचे हे शतक थोडक्यात हुकले होते, परंतु आज त्याने ईडन गार्डनवर इतिहास रचला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 5:39 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : रोहित शर्माने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ती पाहता भारत आज ३५०-४०० धावा बनवेल असे वाटले. पण, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ११ ते २५ षटकांत चांगला मारा केली. विराट कोहली व श्रेयस अय्यर खेळपट्टीवर असूनही त्यांना धावांचा वेग फार काही वाढवता आलेला नव्हता. मात्र, सेट झालेल्या जोडीने नंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोप दिला. दोघांच्या १३४ धावांच्या भागीदारीने भारताला कमबॅक करून दिले. पण, सर्वांना प्रतीक्षा होती ती विराटच्या ४९व्या शतकाची. मागील दोन सामन्यांत ( ८८ व ९५) त्याचे हे शतक थोडक्यात हुकले होते, परंतु आज त्याने ईडन गार्डनवर इतिहास रचला.  

बर्थ डे बॉय विराट कोहलीचा भीमपराक्रम! सचिन तेंडुलकरनंतर हा विक्रम नोंदवणारा एकमेव फलंदाज 

रोहित शर्माच्या २४ चेंडूंत ४० धावांनी भारतासाठी पोषक वातावरण निर्माण केले होते. तो माघारी परतल्यनंतर शुबमन गिल ( २३) बाद झाला आणि पहिल्या १० षटकांत ९१ धावा चोपणाऱ्या भारतीय संघाला पुढील १५ षटकांत केवळ ५२ धावा करता आल्या. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. सुरुवातीला संथ खेळ करून सेट झाल्यानंतर विराट व श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने ( ६) डेव्हिड वॉर्नर ( २०१९) व रोहित शर्मा ( २०१९) यांच्याशी बरोबरी केली. या वर्ल्ड कपमध्ये ५०० धावा पूर्ण करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला. 

३७व्या षटकात विराट-श्रेयसची १३४ ( १५८ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर उत्तुंग फटका त्याने मारला अन् एडन मार्करामने झेल घेतला. श्रेयस ८७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांवर बाद झाला. भारताच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाने एकाच पर्वात सर्वाधिक ३ फिफ्टी प्लस धावांचा विक्रम श्रेयसने नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकर ( १९९२), अजय जडेजा ( १९९९) आणि युवराज सिंग ( २०११) यांचा विक्रम मोडला. श्रेयसच्या विकेटनंतर धावांचा वेग पुन्हा मंदावला होता. विराट मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू संथ गतीने बॅटवर येत असल्याने त्याला यश मिळत नव्हते. लोकेश राहुलने ( ८) मोठा फटका मारला, परंतु व्हॅन डेर ड्युसेनने सुरेख झेल घेतला. 

सूर्यकुमार यादवने ( २२) फटकेबाजी सुरू ठेवली. त्यांची २३ चेंडूवरील ३६ धावांची भागीदारी तब्रेझ शम्सीने तोडली. सूर्या रिव्हर्स स्वीप मारताना चेंडू ग्लोव्हजला लागला अन् क्विंटनने सुरेख झेल घेतला. विराटच्या ४९व्या शतकाची प्रतीक्षा आज संपली. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या सचिनच्या विक्रमाशी आज विराटने बरोबरी केली. शतकाच्या जवळ आल्यानंतर विराट डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेला आणि त्याने १ - २ धाव घेण्यावर भर दिला. विराटने ११९ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. १४ वर्षांपूर्वी जिथून हा प्रवास सुरू झाला होता तिथेच विराटने हे ऐतिहासिक शतक झळकावले. विराटने २७७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला, तर सचिनने ४५२ इनिंग्ज खेळल्या.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका