ICC ODI World Cup India vs Pakistan Live : १ लाखाहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान महामुकाबला सुरू आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बाबर आजम आपल्या संघाबाबत सांघत असताना भारतीय चाहत्यांकडून त्याला चिडवण्याचा निंदनीय प्रकार घडलेला पाहायला मिळाला. मागील सामन्यातील शतकवीर अब्दुल्लाह शफीक ( २०) आणि इमाम-उल-हक ( ३६) यांना भारतीय गोलंदाजांनी मोठी खेळी करू दिली नाही. मोहम्मद सिराजने ८व्या षटकात शफीकला पायचीत केले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने १३व्या षटकात इमामला यष्टिरक्षक लोकेश राहुल करवी झेलबाद केले. पण, या दोन्ही सलामीवीरांनी जसप्रीत बुमराहचा चांगला सामना केला. कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांनी संमयी खेळ केला.
राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीला चूक लक्षात आली, लगेच मैदानाबाहेर गेला अन्...
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाबर आजमसाठी LBW ची जोरदार अपील झाली, रोहितने DRS ही घेतला, परंतु निर्णय अम्पायर्स कॉल आल्याने बाबर वाचला. त्याचा झेलही हार्दिकने टाकला... ही जोडी चांगल्या रंगात दिसत होती आणि प्रत्येक षटकात किमान १-२ चौकार सहज मिळवत होती. ३०व्या षटकात सिराजलाही बाबरने चांगला चौकार खेचला, परंतु भारतीय गोलंदाजाने त्याचे उत्तर दिले. चौथ्या चेंडूवर सिराजने पाकिस्तानी कर्णधाराचा त्रिफळा उडवला. बाबर ५८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५० धावांवर बाद झाला. रिझवानसोबत त्याने ८३ धावांची भागीदारी केली.