ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय गोलंदाजांनी आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अन्य प्रतिस्पर्धी संघांना आव्हान दिले... श्रीलंकेंचा संपूर्ण संघ त्यांनी ५५ धावांवर गुंडाळून भारताला ३०२ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन विक्रम नोंदवला, त्यापाठोपाठ मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व मोहम्मद शमी ( Mohammed Shami) यांनी कहर केला. विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीत आतषबाजी केली. भारताने सलग सातवा विजय मिळवून उपांत्य फेरीची जागा पक्की केली.
६ बाद १४ धावा! बुमराहने इतिहास रचला, सिराज व शमी यांनी श्रीलंकेला घाम फोडला, Video
जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर पथूम निसंकाला भोपळ्यावर पायचीत केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने ३ धक्के दिले आणि मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेची अवस्था ६ बाद १४ अशी झाली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १३ सामन्यांत विकेट्स घेत बुमराहने झहीर खानचा ( २००७- २०११) विक्रम मोडला. श्रीलंकेच्या आघाडीच्या ४ फलंदाजापैकी ३ शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. २००३ मध्ये भारतानेच अटापट्टू, मुबारक व माहेला जयवर्धने यांना भोपळ्यावर बाद केले होते. या वर्ल्ड कपमध्ये १ ते १० षटकांत सर्वाधिक ६ विकेट्स गमावण्याचा नकोसा विक्रम श्रीलंकेच्या नावावर नोंदवला गेला. भारताने चेन्नईत ऑस्ट्रेलियाला २७ धावांत ३ धक्के दिले होते. ( मोहम्मद शमीची पहिली ओव्हर अन्... )
एँजेलो मॅथ्यूज एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता, परंतु शमीने १४व्या षटकात त्यालाही ( १२) माघारी पाठवले. या बळीसह त्याने वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक ४४ ( १४ इनिंग्ज) विकेट्सच्या जहीर खान ( २३ इनिंग्ज) व जवागल श्रीनाथ ( ३३ इनिंग्ज) यांच्याशी बरोबरी केली. वन डेत २००४ मध्ये श्रीलंकेने ३५ धावांवर झिम्बाब्वेला ऑल आऊट केले होते आणि श्रीलंकेने ही धावसंख्या पार करून स्वतःची इभ्रत वाचवली. वर्ल्ड कपमध्ये २००७मध्ये श्रीलंकेने ३६ धावांत कॅनेडाला गुंडाळले होते. शमीला रोखणं अवघड झालं होतं अन् त्याने या वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा ५ विकेट्स घेतल्या आणि तो भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताने ५० धावांवर श्रीलंकेला गुंडाळले होते आणि आज त्यांना १९.४ षटकांत ५५ धावा करता आल्या.
तत्पूर्वी, विराट कोहली ( ८८) , शुबमन गिल ( ९२) आणि श्रेयस अय्यर ( ८२) यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. या तिघांची शतकं अगदी थोडक्यात हुकल्याने स्टेडियममधील प्रेक्षक नाराज झाले होते. पण, एकामागून एक तिघांनी खणखणीत फटकेबाजी करून भारताला ८ बाद ३५७ धावांपर्यंत पोहोचवले. विराट व शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला हतबल केले. लोकेश राहुल ( २१) व श्रेयस अय्यर यांनी ४७ चेंडूंत ६० धावा जोडल्या. रवींद्र जडेजाने २४ चेंडूंत ३५ धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत एकही वैयक्तिक शतक न होता एखाद्या संघाकडून झालेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१९मध्ये पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या.
Web Title: ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : India beat Sri Lanka by 302 runs; qualifies for semifinal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.