ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला. अफगाणिस्ताच्या खेळाडूंनी ५ सोपे झेल टाकले आणि स्टम्पिंगही सोडला. इंग्लंडवरील विजयानंतर अफगाणिस्तानकडून अपेक्षा उंचावल्या होत्या आणि त्यांनी आज न्यूझीलंडविरुद्ध चांगले पुनरागमनही केले होते. किवींचे ३ फलंदाज त्यांनी अवघ्या १ धावेवर माघारी पाठवले होते. त्यामुळे १ बाद १०९ वरून त्यांची अवस्था ४ बाद ११० अशी झाली आणि न्यूझीलंडची यापेक्षा दयनीय अवस्था त्यांना करता आली असती, परंतु त्यांनी सोपे झेल टाकल्याने वाट लागली.
NZ vs AFG Live : वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल! मिचेल सँटनरच्या 'झेप' समोर सर्वच फेल, Video
न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स ( ७१) व टॉम लॅथम ( ६८) यांनी जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना वैयक्तिक अर्धशतकासह १४४ धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या किवी फलंदाजांमध्ये ग्ले फिलिप्सने चौथे स्थान पटकावले. न्यूझीलंडने ६ बाद २८८ धावा केल्या. मार्क चॅम्पमनने १२ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. वर्ल्ड कप २०२३ मध्ये ४१ ते ५० षटकांत सर्वाधिक धावा देणाऱ्या संघात अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्यांनी आज १०३ धावा दिल्या. श्रीलंकेने दिल्लीत दक्षिण आफ्रिकेला १३७ धावा दिल्या होत्या. नेदरलँड्सविरुद्ध हैदराबाद येथे न्यूझीलंडने ८४ धावा केलेल्या, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध लखनौ येथे आफ्रिकेने ७९ धावा केलेल्या.
दरम्यान, अफगाणिस्तानला सावध खेळ करूनही काही खास छाप पाडता आली नाही. २७ धावांवर त्यांचा पहिला फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज ( ११) मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पुढच्याच षटकात ट्रेंट बोल्टने इब्राहिम झाद्रानला ( १४) सँटनरकरवी झेलबाद केले. १४व्या षटकात ल्युकी फर्ग्युसनने टाकलेल्या बाऊन्सरवर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी फसला अन् मिचेल सँटनरने अफलातून झेल घेतला. आझमतुल्लाह ओमारझाई आणि रहमत शाह यांची ५४ धावांची भागीदारी ट्रेंट बोल्टने संपुष्टात आणली. राचिन रवींद्रने अफगाणिस्तानचा सेट फलंदाज रहमतला ( ३६) पायचीत केले आणि त्यांची अवस्था ५ बाद १०७ अशी केली.