ICC ODI World Cup NZ vs AFG Live : न्यूझीलंडनेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानला पराभूत करून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आजच्या सामन्यात त्यांच्याकडून कडवी टक्कर पाहायला मिळेल, असे वाटले होते. पण, आज न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १३९ धावांवर गुंडाळून किवींनी १४९ धावांनी विजय मिळवला. किवींचा हा चौथा विजय ठरला आणि ८ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले.
वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल! मिचेल सँटनरच्या 'झेप' समोर सर्वच फेल, Video
अफगाणिस्तानला सावध खेळ करूनही काही खास छाप पाडता आली नाही. २७ धावांवर त्यांचा पहिला फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज ( ११) मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पुढच्याच षटकात ट्रेंट बोल्टने इब्राहिम झाद्रानला ( १४) झेलबाद केले. १४व्या षटकात ल्युकी फर्ग्युसनच्या बाऊन्सरवर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी फसला अन् मिचेल सँटनरने अफलातून झेल घेतला. आझमतुल्लाह ओमारझाई ( २७) आणि रहमत शाह यांची ५४ धावांची भागीदारी ट्रेंट बोल्टने संपुष्टात आणली. राचिन रवींद्रने रहमतला ( ३६) पायचीत केरून १०७ धावांवर निम्मा संघ माघारी पाठवला.
संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मोहम्मद नबी ( ७) आणि राशीद खान ( ८) यांना अनुक्रमे सँटनर व फर्ग्युसन माघारी पाठवून किवींचा विजय निश्चित केला. मुजीब उर रहमान (४) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर त्यांच्या धडाधड विकेट गेल्या आणि १३९ धावांवर ऑल आऊट केले. मिचेल सँटनर आणि फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला. अफगाणिस्ताच्या खेळाडूंनी ५ सोपे झेल टाकले. ग्लेन फिलिप्स ( ७१) व टॉम लॅथम ( ६८) यांनी जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना वैयक्तिक अर्धशतकासह १४४ धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या किवी फलंदाजांमध्ये ग्ले फिलिप्सने चौथे स्थान पटकावले. न्यूझीलंडने ६ बाद २८८ धावा केल्या. मार्क चॅम्पमनने १२ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या.