ICC ODI World Cup NZ vs BAN Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड संघाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले. न्यूझीलंडने आज चेन्नईत झालेल्या सामन्यात बांगलादेशवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकलेला केन विलियम्सन ( Kane Williamson) आज कर्णधाराच्या भूमिकेत दिसला. त्याने संयमी खेळ करताना ७८ धावांची खेळी केली आणि डॅरील मिचेलसोबत ( ) शतकी भागीदारी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण, दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या केनला आजच्या सामन्यात पुन्हा दुखापत झाली आणि retiring hurt होऊन त्याला मैदान सोडावे लागले. त्याची ही दुखापत गंभीर नसावी, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी आज चांगला मारा केला. न्यूझीलंडला तिसऱ्या षटकात मुस्ताफिजूर रहमानने सलामीवीर राचिन रवींद्रला ( ९) माघारी पाठवून धक्का दिला. बांगलादेशच्या गोलंदाजांचा मारा उत्तम राहिला आणि पहिल्या १० षटकांत किवींना केवळ ३६ धावा करता आल्या. डेव्हॉन कॉनवे व केन विलियम्सन खेळपट्टीवर होते, परंतु त्यांना धावांचा वेग वाढवू दिला नव्हता. २१व्या षटकात अखेर ८० धावांची भागीदारी करणारी ही जोडी तुटली. शाकिबने ४५ धावांवर खेळणाऱ्या कॉवनेला पायचीत केले. केनने अनुभवाचा वापर करून ८१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वर्ल्ड कपमधील हे त्याचे चौथे अर्धशतक ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केनची ही १३४ वी ५०+ धावांची खेळी ठरली आणि त्याने रॉस टेलरचा ( १३३) न्यूझीलंडकडून सर्वाधिक ५०+ खेळींचा विक्रम मोडला.
केनच्या सोबतीला डॅरील मिचेल उभा राहिला. मिचेल मागील काही सामन्यांत कामगिरीशी संघर्ष करताना दिसला, परंतु आज त्याने संयमी खेळ करताना ४३ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि केनसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. दरम्यान, बांगलादेशच्या खेळाडूने केलेला थ्रो केनच्या डाव्या हाताच्या बोटांवर आदळल्याने किवींची धाकधूक वाढली. नुकताच केन दुखापतीतून बरा झाला आहे. आजच्या दुखापतीनंतर त्याने रिटायर हर्ट होण्याचा निर्णय घेतला. केनने १०७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ७८ धावा केल्या आणि त्याने मिचेलसह १०८ धावांची भागीदारी केली. मिचेलने त्यानंतर फटकेबाजी करून सामना लगेच संपवला. न्य़ूझीलंडने ४२.५ षटकांत २ बाद २४८ धावा करून विजय मिळवला. मिचेलने ६७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८९ धावा केल्या. ग्लेन फिलिप्स १६ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, ४ बाद ५६ अशा धावसंख्येवरून बांगलादेशने आज चांगले कमबॅक केले. कर्णधार शाकिब अल हसन ( ४०) आणि मुश्फीकर रहीम ( ६६) या अनुभवी खेळाडूंनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडकडून ल्युकी फर्ग्युसन ( ३-४९)ने चांगला मारा केला. तनझीद हसन ( १६), लिटन दास ( ०), नजमूल होसैन शांतो ( ७) आणि मेहिदी हसन मिराझ ( ३०) हे ५६ धावांच्या आत माघारी परतले. शाकिब आणि मुस्फीकर ही अनुभवी जोडी उभी राहिली आणि ९६ धावांच्या भागीदारीसह संघाला सावरले. महमुदुल्लाहने नाबाद ४१ धावा करून संघाला ९ बाद २४५ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: ICC ODI World Cup NZ vs BAN Live : 3rd win for New Zealand, beat Bangladesh by 8 wickets; but Kane Williamson's walking back retired hurt, he receives a blow on thumb
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.