ICC ODI World Cup NZ vs BAN Live : न्यूझीलंड आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला आहे. केन विलियम्सन याच्या पुनरागमनाने संघाची बाजू अधिक मजबूत झाली आहे. आज बांगलादेशविरुद्ध त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ल्युकी फर्ग्युसनने त्याच्या पहिल्या आणि संघाच्या ८व्या षटकात बांगलादेशचा सलामीवीर तनझीद हसनला ( १६) बाद केले. लिटन दास ( ०), नजमूल होसैन शांतो ( ७) आणि मेहिदी हसन मिराझ ( ३०) यांना माघारी पाठवून न्यूझीलंडने बांगलादेशची अवस्ता ४ बाद ५६ अशी केली होती. पण, कर्णधार शाकिब अल हसन आणि मुस्फीकर रहीम ही अनुभवी जोडी उभी राहिली आणि ९६ धावांच्या भागीदारीसह संघाला सावरले. फर्ग्युसनने आजच्या सामन्यातील तिसरी विकेट घेताना शाकिबला ४० धावांवर झेलबाद केले. शाकिबने ३ चौकार व २ षटकार खेचले.
मॅट हेन्रीने बांगलादेशला मोठा धक्का दिला. त्याने टाकलेला संथ गतीचा चेंडू रहीमला नाही समजला. कमी उसळीने आलेला हा चेंडू थेट यष्टींवर जाऊन आदळला अन् रहीम मैदानावर बसला. रहीमने ७५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६६ धावा केल्या. बोल्टने बांगलादेशचा सातवा फलंदाज तोवहीद हृदोयला ( १३) बाद करून वन डे क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या.