ICC ODI World Cup NZ vs BAN Live : ४ बाद ५६ अशा धावसंख्येवरून बांगलादेशने आज चांगले कमबॅक केले. कर्णधार शाकिब अल हसन आणि मुश्फीकर रहीम या अनुभवी खेळाडूंनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडकडून ल्युकी फर्ग्युसन ( ३-४९)ने चांगला मारा केला. ट्रेंट बोल्टने आज वन डे क्रिकेटमधील बळींचे द्विशतक पूर्ण करताना मोठा विक्रम नोंदवला. रहीम व शाकिब यांनी भारताच्या वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला.
बांगलादेशचा रहीम असा कसा OUT झाला? स्टम्प उडताच जागेवर बसला, Video
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ल्युकी फर्ग्युसनने त्याच्या पहिल्या आणि संघाच्या ८व्या षटकात बांगलादेशचा सलामीवीर तनझीद हसनला ( १६) बाद केले. लिटन दास ( ०), नजमूल होसैन शांतो ( ७) आणि मेहिदी हसन मिराझ ( ३०) यांना माघारी पाठवून न्यूझीलंडने बांगलादेशची अवस्ता ४ बाद ५६ अशी केली होती. पण, कर्णधार शाकिब अल हसन आणि मुस्फीकर रहीम ही अनुभवी जोडी उभी राहिली आणि ९६ धावांच्या भागीदारीसह संघाला सावरले. फर्ग्युसनने आजच्या सामन्यातील तिसरी विकेट घेताना शाकिबला ४० धावांवर झेलबाद केले. शाकिबने ३ चौकार व २ षटकार खेचले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या जोडींमध्ये रहीम व हसन यांनी दुसरे स्थान पटकावले. त्यांनी १९ इनिंग्जमध्ये ९७२* धावा जोडल्या. यासह त्यांनी वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर यांचा २० इनिंग्जमधील ९७१ धावांची विक्रम मोडला. मॅथ्यू हेडन व अॅडम गिलख्रिस्ट यांनी २० इनिंग्जमध्ये सर्वाधिक १२२० धावा जोडल्या आहेत.
मॅट हेन्रीने बांगलादेशला मोठा धक्का दिला. त्याने रहीमचा त्रिफळा उडवला . रहीमने ७५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६६ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने बांगलादेशचा सातवा फलंदाज तोवहीद हृदोयला ( १३) बाद करून वन डे क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या. वन डे क्रिकेटमध्ये बोल्टने १०७ सामन्यांत हा टप्पा गाठला अन् सर्वात कमी सामन्यांत विकेट्सचे द्विशतक साजरा करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. मिचेल स्टार्क ( १०२) व साकलेन मुश्ताक ( १०४) हे त्याच्या पुढे आहेत, तर बोल्टने आज ब्रेट ली ( ११२) व अॅलन डोनाल्ड ( ११७) यांचा विक्रम मोडला. २०० विकेट्ससाठी बोल्टने ५७६३ चेंडू फेकली आणि वकार युनिसला ( ५८८३ चेंडू) मागे टाकले. तस्कीन अहमदने १७ व महमुदुल्लाहने ४१* धावा करून संघाला ९ बाद २४५ धावांचा सन्मानजनक पल्ला गाठून दिला.