ICC ODI World Cup NZ vs SL Live : न्यूझीलंडनेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चौथे स्थान जवळपास पटकावले. श्रीलंकेवर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दणदणीत विजयाची नोंद करून किवींनी पाकिस्तानच्या तोंडावर दार आपटले. १७२ धावा विजयासाठी हव्या असताना डेव्हॉन कॉनवे व रचिन रवींद्र यांनी स्फोटक सुरुवात करून दिली आणि उपांत्य फेरीत भारताविरुद्ध मिटींग फिक्स केली. २०१९मध्ये न्यूझीलंडने भारताचे आव्हान संपुष्टात आणले होते. महेंद्रसिंग धोनीचा झालेला रन आऊट आजही चाहत्यांच्या मनात ताज्या जखमेप्रमाणे आहेत. टीम इंडियाने यावेळी त्याचा वचपा घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे.
रचिन रवींद्रचा वर्ल्ड रेकॉर्ड! मोडला १९९६ पासून सचिनच्या नावावर असलेला विक्रम
रचिन व कॉनवे यांनी पहिल्या १० षटकांतच ७५ धावा फलकावर चढवल्या. रचिन अजून पंचवीशीतही पोहोचलेला नाही आणि त्याने कमी वयात वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक ५२३ धावांचा सचिन तेंडुलकरच्या ( १९९६) धावांचा विक्रम मोडला. ही त्याची पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा आहे आणि पदार्पणात सर्वाधिक ५३२ धावांचा जॉनी बेअरस्टोचा (२०१९) विक्रमही त्याने आज स्वतःच्या नावावर केला. या दोघांनी १२.२ षटकांत ८६ धावा फलकावर चढवल्या अन् दुष्मंथा चमिराने ही जोडी तोडली. कॉनवे ४२ चेंडूंत ९ चौकारांसह ४५ धावांवर झेलबाद झाला.
पुढच्या षटकात रचीनही बाद झाला. त्याने ३४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. केन विलियम्सन आणि डॅरील मिचेल यांनी २९ चेंडूंत ४२ धावा जोडताना सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. पण, मॅथ्यूजने तिसरा धक्का देताना केनला ( १४) बाद केले. मार्क चॅम्पमन ( ७) रन आऊट झाला. किवींच्या विकेट पडत असल्याने पाकिस्तानच्या आशा पल्लवीत होत होत्या. पण, मिचेलने ३१ चेंडूंत ४३ धावा चोपून सामना एकतर्फी केला. न्यूझीलंडने २३.२ षटकांत ५ बाद १७२ धावा करून सामना जिंकला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आज तिखट मारा करून ही जगातील घातक गोलंजादांची फळी का आहे हे सिद्ध केले. कुसल परेराने या वर्ल्ड कपमधील वेगवान ( २२ चेंडू) अर्धशतक झळकावताना २८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा चोपल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या १०व्या जोडीने ८७ चेंडूंत ४३ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. महीशा तीक्षणा ( ३९*) आणि दिलशान मधुसंका ( १९) यांनी दहाव्या विकेटसाठी ही विक्रमी भागीदारी केली. ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेतल्या. ल्युकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.