ICC ODI World Cup NZ vs SL Live : न्यूझीलंडचा संघ पराभवाची मरगळ झटकून आज ताजेतवान होऊन मैदानावर उतरला अन् उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करताना दिसला. न्यूझीलंडने आज श्रीलंकेविरुद्ध दर्जेदार गोलंदाजी केली आणि त्यामुळे पाकिस्तानच्या पोटात गोळा आलाय. आज न्यूझीलंडचा विजय त्यांना उपांत्य फेरीत पोहोचवणारा ठरणार आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या उरलेल्या आशाही संपुष्टात येणार आहे. महीशा तीक्षणा आणि दिलशान मधुसंका यांनी दहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून श्रीलंकेला सन्मानजकन धावसंख्या उभारून दिल्या.
नाणेफेक जिंकून त्यांनी श्रीलंकेला प्रथम फलंदाजीला बोलावले आणि दुसऱ्याच षटकात टीम साऊदीने सलामीवीर पथूम निसंका ( २) याला बाद केले. त्यानंतर ट्रेंट बोल्टने एकाच षटकात कुसल मेंडिस ( ६) व सदीरा समराविक्रमा ( १) यांना माघारी पाठवले. कुसल परेराने दमरार खेळ करताना २२ चेंडूंत या वर्ल्ड कपमधील वेगवान अर्धशतक झळकावले. बोल्टने दुसऱ्या बाजूने श्रीलंकेला धक्का देताना चरिथ असलंकाला ( ८) पायचीत केले. परेरा व असलंका यांनी ३८ धावांची भागीदारी केली होती. बोल्ट वर्ल्ड कपमध्ये ५० विकेट्स घेणारा किवींचा पहिला आणि जगातला सहावा गोलंदाज ठरला. ल्युकी फर्ग्युसनने त्याच्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने २८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा करणाऱ्या परेराला माघारी पाठवले.
श्रीलंकेचा निम्मा संघ ९.३ षटकांत ७० धावांवर माघारी परतला. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजया डी सिल्वा यांनी ३४ धावा जोडून डावाला आकार दिलाच होता. पण, मिचेल सँटनरच्या फिरकीवर मॅथ्यूज ( १६) स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. पाठोपाठ सँटनरने धनंजयालाही ( १९) माघारी पाठवून श्रीलंकेला सातवा धक्का दिला. फर्ग्युसनने दिवसातील त्याची दुसरी विकेट घेताना चमिरा करुणारत्नेला ( ६) बाद केले. सँटनरने १०-२-२२-२ अशी स्पेल टाकली. त्यानंतर रचिन रवींद्रने एक विकेट घेतली. महीशा तीक्षणा आणि दिलशान मधुसंका यांनी १०व्या विकेटसाठी चिवट खेळ केली आणि ३८ धावा जोडून वर्ल्ड कपमधील श्रीलंकेकडून १०व्या विकेटसाठी झालेली सर्वोत्तम भागीदारी केली.
तीक्षणाने आज वर्ल्ड कपमध्ये ९व्या किंवा खालच्या क्रमांकावरील फलंदाजाकडून सर्वाधिक ८४+ चेंडू खेळण्याचा विक्रम केला. त्याने २००३ सालचा एंडि बिकल ( वि. न्यूझीलंड) याचा विक्रम मोडला. या दोघांनी ८७ चेंडूंत ४३ धावा केल्या. मधुशंका ४८ चेंडूंत १९ धावांवर बाद झाला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ४६.४ षटकांत १७१ धावांत माघारी परतला. तीक्षणा ९१ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला.