ICC ODI World Cup PAK vs AFG Live : अफगाणिस्तानच्या संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा धक्कादायक निकाल नोंदवला. गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आज अफगाणिस्ताननीबाबर आजमच्यापाकिस्तान संघाचा सुपडा साफ केला. तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानच आता जवळपास संपल्यात जमा झाले आहे. पाकिस्तानी खेळाडूंचा क्षेत्ररक्षणातील गचाळपणा पाहून प्रशिक्षक मिकी आर्थरही प्रचंड संतापले अन् ते रागात ड्रेसिंग रुममध्ये गेले. उर्वरित ४ सामन्यांत इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा पाकिस्तानला सामना करायचा आहे आणि हे चारही सामने जिंकले तर त्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण होऊ शकतो.
Video : अफगाणिस्तानच्या ओपनर्सनी पाकिस्तानला बदडलं, वैतागलेल्या प्रशिक्षकांनी डग आऊट सोडलं
अफगाणिस्तानचे ओपनर्स रहमनुल्लाह गुरबाज व इब्राहिम झाद्रान यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. हॅरिस रौफच्या पहिल्याच षटकात गुरबाजने १७ धावा चोपल्या. पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांचा गोंधळ पाहून हसावं की रडावं, हे त्यांच्या चाहत्यांनाही कळत नव्हतं. २२व्या षटकात अखेर पाकिस्तानला यश मिळालं. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर गुरबाजने मारलेला अपर कट उसामा मीरने झेलला. गुरबाज ५३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६५ धावांवर बाद झाला आणि १३० धावांची भागीदारी संपुष्टात आली. वर्ल्ड कप स्पर्धेतील कोणत्याही विकेटसाठी अफगाणिस्तानकडून ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली.
अफगाणिस्तानने २५ षटकांत १ बाद १५२ धावा करून विजयाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल सुरू ठेवली होती. झाद्रान व रहमत शाह यांनी जबाबदारीने खेळ करून ६० धावा जोडल्या. झाद्रान ११३ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ८७ धावांवर बाद झाला. वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. रहमत शाहने ५७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हशमतुल्लाह शाहिदी आणि शाह यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६* धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा पराभव पक्का केला. अफगाणिस्तानने ८ विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. ४८ वर्षांच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहासात पाकिस्तानने २७५+ धावा केल्यानंतर एकही मॅच गमावली नव्हती. अफगाणिस्तानचा हा वन डे क्रिकेटमधील मोठ विजय ठरला. शाहिदी ४३ चेंडूंवर ४८ धावांवर नाबाद राहिला, तर शाहने ८४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावा केल्या. अफगाणिस्तानने ४९ षटकांत २ बाद २८६ धावा केल्या.
तत्पूर्वी, इमाम-उल-हक ( १७) आणि अब्दुल्लाह शफिक ( ५८) यांनी चांगली सुरुवात करून दिली. सौद शकिल ( २५) व बाबर आजम आणि त्यानंतर बाबर व शादाब खान यांनी चांगली खेळी केली. बाबर ९२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर झेलबाद झाला. इफ्तिखार व शादाब यांनी चांगली फटकेबाजी करून ४५ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली आणि इफ्तिखार २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या आतषबाजीसह ४० धावांवर झेलबाद झाला. शादाबने ३७ चेंडूंत ४० धावा केल्या आणि पाकिस्तानला ७ बाद २८२ धावांवर समाधान मानावे लागले.