ICC ODI World Cup PAK vs AFG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन पराभवानंतर आज पाकिस्तानने चांगला खेळ केला. अपेक्षा होती. पण, बाबर आजमची ( Babar Azam) अर्धशतकी खेळी वगळल्यास अन्य फलंदाजांनी माना टाकल्याने अफगाणिस्तानने सामन्यावर पुन्हा पकड घेतली. बाबरच्या विकेटनंतर इफ्तिखार अहमद व शादाब खान यांनी चांगली फटकेबाजी केली. १८वर्षीय नूर अहमद ( Noor Ahmad) याने ४९ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
इमाम-उल-हक ( १७) आणि अब्दुल्लाह शफिक ( ५८) यांच्या चांगल्या सुरुवातीनंतरही पाकिस्तानच्या मधल्या फळीने आज निराश केले. १८ वर्षीय गोलंदाज नूर अहमदने पाकिस्तानच्या अनुभवी मोहम्मद रिझवान ( ८) यांना माघारी पाठवले. बाबर आणि सौद शकील यांनी पाकिस्तानच्या डावाला पुन्हा उभारी देण्यास सुरूवातच केली होती, की मोहम्मद नबीने धक्का दिला. सौद ३४ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. बाबर खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याला शादाब खानने चांगली साथही दिली होती. दोघांची ४३ धावांची भागीदारी तोडण्यासाठी नूर अहमदला पुन्हा गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने कमाल केली.
बाबर ९२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर झेलबाद झाला. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का होता, कारण अखेरच्या षटकांत वेगाने धावा करण्याची जबाबदारी बाबरवर होती. ४२व्या षटकात बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानच्या २०६ धावा होत्या आणि त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ४५ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली आणि इफ्तिखार २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या आतषबाजीसह ४० धावांवर झेलबाद झाला. शादाबने ३७ चेंडूंत ४० धावा केल्या आणि पाकिस्तानला ७ बाद २८२ धावांवर समाधान मानावे लागले.