ICC ODI World Cup PAK vs AUS Live : भारताकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ पूर्णपणे सावरलेला दिसत नाहीए... ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने लागूनही बाबर आजमने पायावर धोंडा मारून घेतला. डेव्हिडन वॉर्नर व मिचेल मार्श ( David Warner - 163 & Mitchell Marsh - 121) यांच्या विक्रमी फटकेबाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचे हाले हाल केले. दोघांच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला तीनशेपार नेले आणि उरलेली कसर ऑसींच्या अन्य फलंदाजांनी भरून काढली. पाकिस्तानसमोर तगडे लक्ष्य उभे केले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत चांगले पुनरागमन केले. शाहीन शाह आफ्रिदीने ५ विकेट्स घेतल्या.
डेव्हिड वॉर्नर-मिचेल मार्श यांच्याकडून पाकिस्तानची निर्दयी धुलाई! ०९ मोठ्या विक्रमांचा वर्षाव
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी आज दमदार फटकेबाजी केली. हसन अलीची धुलाई केल्यानंतर वॉर्नरने अनुभवी गोलंदाज हॅरिस रौफच्या एका षटकात २४ धावा कुटल्या. ऑसींनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा कुटल्या आणि या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. बाबरने सहा गोलंदाज वापरले, तरीही उपयोग नाही झाला. वॉर्नरने ८५ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. मार्शनेही १०० चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावांची भागीदारी केली. २०११ मध्ये ब्रॅड हॅडीन व शेन वॉटसन यांनी कॅनडाविरुद्ध १८३ धावांची सलामी दिली होती.
३४व्या षटकात अखेर पाकिस्तानला पहिली विकेट मिळाली. मार्श १०८ चेंडूंत १० चौकार व ९ षटकारांसह १२१ धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलनेही पहिल्याच चेंडूवर उत्तुंग फटका मारला आणि भोपळ्यावर झेलबाद झाला. या विकेट्सनंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला ब्रेक लागला होता. स्टीव्ह स्मिथही ( ७) उसामा मीरच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. वॉर्नर आज दोनशे मारेल अशी सर्वांना आशा होती, परंतु अखेर हॅरिस रौफला त्याची विकेट घेण्यात यश मिळाले. वॉर्नर १२४ चेंडूंत १४ चौकार व ९ षटकारांसह १६३ धावांवर झेलबाद झाला. जोश इंग्लिसही ( १३) हॅरिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिसही ( २१) फार काही करू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग किंचितसा मंदावला आणि त्यांना ५० षटकांत ९ बाद ३६७ धावाच करता आल्या.