ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा बाबर आजमचा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आला आहे. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज हॅरिस रौफलाही ऑसींनी नाही सोडले. वॉर्नरने १४५ किमी वेगाने आलेला चेंडू गुडघ्यावर बसून असा भिरकावला की तो थेट स्टेडियमच्या छतावर आदळला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांच्या पथ्यावर पडला. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. शादाब खानच्या जागी आज उसामा मीरला शेजाऱ्यांच्या संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी हसन अलीला पहिल्या ३ षटकांत बदडून काढले. शाहीन आफ्रिदी एका बाजूने टिच्चून मारा करत होता, परंतु त्यालाा क्षेत्ररक्षकांकडूनही साथ मिळत नव्हती. पहिल्या षटकात पाकिस्तानने DRS गमावला, तर पाचव्या षटकात वॉर्नरने बाहेरच्या चेंडूवर मारलेला फटका हवेत उडाला. मीरने तो झेल सोडला.
वॉर्नरने गुडघ्यावर बसून हॅरीस रौफला मारलेला सिक्स स्टेडियमच्या छतावर आदळला. त्या षटकात वॉर्नरने २४ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नरने ( १०९०*) दुसरे स्थान पटकावले. रिकी पाँटिंग १७४३ धावांसह अव्वल स्थानावर आहे. वॉर्नरने आज अॅडम गिलख्रिस्टचा ( १०८५) विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा कुटल्या आणि या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या १३ षटकांत १०९ धावा केल्या आहेत.