ICC ODI World Cup PAK vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान संघाचे पॅक अप झाले. इंग्लंडविरुद्धची आजची लढत आता केवळ औपचारिकता ठरली. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला. तरीही बाबर आजम पॉझिटिव्ह होता. तो म्हणाला, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, परंतु नाणेफेक आमच्या हातात नाही. आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि आम्ही इंग्लंडला लवकरात लवकर ऑल आऊट करायचा प्रयत्न करू.
PAK vs ENG Live : पाकिस्तानसमोर ६.१ षटकांत ३०० धावांचे लक्ष्य; इंग्लंडने टॉस जिंकून केली कोंडी
पण, बाबरच्या या सकारात्मकतेच्या पाकिस्तानी गोलंदाजांनी चिंधड्या उडवल्या. हॅरिस रौफ पुन्हा अपयशी ठरला अन् त्याच्या ३ षटकांत डेवीड मलान व जॉनी बेअरस्टो यांनी ३० धावा कुटल्या. शाहीन आफ्रिदीने पहिली स्पेल जरा बरी टाकली. इंग्लंडने पॉवर प्लेमध्ये ७२ धावा चोपल्या आणि यंदाच्या वर्ल्ड कपमधील ही पॉवर प्लेमधील त्यांची तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. नेदरलँड्सविरुद्धही त्यांना पहिल्या १० षटकांत एवढ्या धावा करता आल्या नव्हत्या, शिवाय ऑरेंज आर्मीने १ विकेटही घेतली होती. पाकिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये ९ पैकी ६ सामन्यांत पहिल्या पॉवर प्लेमध्ये ६० हून अधिक धावा दिल्या आहेत. यावरून त्यांचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले हे सिद्ध होते.
मलान ३१ धावांवर बाद झाला आणि ८२ धावांची भागीदारी तुटली. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज रौफने नकोसा विक्रम नावावर केला. एकाच वर्ल्ड कपमध्ये ५०० हून अधिक धावा देणारा तो आशियातील पहिला गोलंदाज ठरला. बेअरस्टोने अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडने १६ षटकांत १ बाद ९६ धावा केल्या आहेत.