ICC ODI World Cup PAK vs NED : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला काही खास सुरुवात करता आलेली नाही. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नेंदरलँड्सच्या ऑरेंज आर्मीने पाकिस्तानची हालत खराब केली आहे. सौद शकील व मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला, परंतु त्यांनाही मागे पाठवून नेदरलँड्सने सामना गाजवला.
नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि बाबर आजमने आम्ही ३०० पार जाण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. पण, फखर जमान आणि इमाम-उल-हक यांना आश्वासक सुरुवात करून देता आली नाही. फखरने १५ चेंडूंत ३ चौकारांसह १२ धावा केल्या, परंतु चौथ्या षटकात लॉगन व्हॅन बीकने स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम रिटर्न झेल घेतला. फखरला माघारी जावे लागले. कर्णधार बाबर आजमकडून आज बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु तोही कॉलीन आर्कमनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. इमामला ( १५) पॉल व्हॅन मीकेरनेने बाऊन्सरवर फटका मारण्यास भाग पाडले अन् तो झेलबाद झाला. पाकिस्तानचे तीन फलंदाज ३८ धावांवर माघारी परतले होते.
मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी वैयक्तित अर्धशतक झळकावण्यासोबतच नेदरलँड्सला बॅकफूटवर फेकले. या दोघांनी ११४ चेंडूंत १२० धावा जोडल्या आणि आर्यन दत्तने पाकिस्तानला धक्का दिला. शकील ५२ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६८ धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ डी लीडने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. ६८ धावा करणाऱ्या रिझवानचा त्याने त्रिफळा उडवला. इफ्तिखार अहमदही ( ९)त्याच षटकात माघारी परतल्याने त्यांची अवस्था ६ बाद १८८ अशी झाली.