ICC ODI World Cup PAK vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा संघ ५० षटकंही टिकला नाही आणि तेही नेदरलँड्ससारख्या दुबळ्या संघासमोर. नेदरलँड्सच्या बॅस डी लीडने ( Bas De Leede ) सर्वाधिक ४ विकेट्स घेत आजचा सामना गाजवला. या कामगिरीसह त्याने त्याचे वडील टीम डी लीड यांचा पाकिस्तानकडून झालेल्या अपमानाचा बदला घेतला.
नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. फखर जमान ( १२), इमाम-उल-हक ( १५) आणि बाबर आजम ( ५) हे ३८ धावांवर माघारी परतले होते. मोहम्मद रिझवान ( ६८) व सौद शकील ( ६८) यांनी ११४ चेंडूंत १२० धावा जोडल्या आणि आर्यन दत्तने ही जोडी तोडली. शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी ६० धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मजबूत स्थितीत आणले. शादाब ३२ धावांववर त्रिफळाचीत झाला. डी लीडने पुढच्या षटकात हसन अलीला गोल्डन डकवर माघारी पाठवले आणि ही त्याची चौथी विकेट ठरली. मोहम्मद नवाज ( ३९) रन आऊट झाला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९ षटकांत २८६ धावांवर तंबूत परतला.
१९९६च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्गेती टीम डी लीड यांना पाकिस्तानविरूद्ध १९ चेंडू खेळूनही खाते न उघडता तंबूत जावे लागले होते आणि आज त्यांच्या मुलाने पाकिस्तानविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करून त्यांच्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.