ICC ODI World Cup PAK vs SA Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान संघाचे आव्हानही जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांना सलग चौथ्या सामन्यात आज हार पत्करावी लागली. दक्षिण आफ्रिकेने विजयी घोडदौड कायम राखताना १० गुणांची कमाई करून भारताला धक्का दिला. गुणतालिकेत आता सरस नेट रन रेटवर आफ्रिका अव्वल स्थानावर गेला आहे. पाकिस्तान संघाने आज अखेरच्या क्षणापर्यंत दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. एडन मार्करामच्या ( ९१) विकेटनंतर सामना पाकिस्तानच्या बाजूेने झुकला होता आणि चाहत्यांची धडधड वाढली होती. त्यात हॅरीस रौफने आफ्रिकेला नववा धक्का दिला आणि सर्वांचे टेंशन वाढले. पण, केशव महाराजने चौकार मारून थरारक विजय मिळवून दिला.
टेक्निकल 'लोचा'! रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या विकेटने गोंधळ, पाकिस्तानवर भडकले नेटिझन्स
क्विंटन डी कॉकने आक्रमक फटकेबाजी केली. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात त्याने ४,१w,४,४,४,२,० अशी फटकेबाजी केली. पण, पुढच्याच षटकात शाहीनने त्याला ( २४) बाद केले. दोन सामन्यानंतर पुनरागमन करणारा कर्णधार टेम्बा बवुमा २८ धावांवर झेलबाद केले. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिल्डिंग करताना शादाब खान जखमी झाला आणि त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी कन्कशन म्हणून आलेल्या उसामा मीरने पाकिस्तानला तिसरी विकेट मिळवून दिली. एडन मार्करम व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावा जोडल्या होत्या, परंतु मीरने २१ धावांवर खेळणाऱ्या डेर ड्युसेनला पायचीत केले.
विजयासाठी २१ धावा हव्या असताना उसामा मीरने मार्करमला माघारी पाठवले. सामना इथे संपला नव्हता शाहीनने ( ३-४५) आणखी एक धक्का देताना गेराल्ड कोएत्झीला ( १०) बाद केले आणि सामन्यात रंगत आणली. केशव महाराज व लुंगी एनगिडी संयमाने एकेक धाव घेताना दिसले. हॅरिस रौफने ४६व्या षटकात एनगिडीचा अफलातून झेल घेतला. हॅरिसने त्या षटकात तब्रेझ शम्सीसाठी DRS घेतला, परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो वाचला. केशव महाराज व शम्सीने संयम दाखवला अन् ४७.२ षटकांत आफ्रिकेचा विजय पक्का केला. १ विकेटने त्यांनी ही मॅच जिंकली.
तत्पूर्वी, पाकिस्तानचा संपूर्ण संघ २७० धावांत माघारी परतला. कर्णधार बाबर आजम आणि सौद शकील यांनी अर्धशतक झळकावले, तर शाबाद खानने चांगली फटकेबाजी केली. तब्रेझ शम्सीने ४, मार्को यानसेनने ३ आणि गेराल्ड कोएत्झीने २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद रिझवानने ( ३१) बाबरसह तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची, तर बाबर ( ५०) व इफ्तिखार अहमद ( २१) यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावा जोडल्या. शादाब खान ( ४३) आणि सौद शकील ( ५२) यांनी आक्रमक खेळ करून ७१ चेंडूंत ८४ धावा जोडल्या. मोहम्मद नवाजने २४ धावांची खेळी केली.