ICC ODI World Cup PAK vs SL Live : श्रीलंकेच्या फलंदाजांनी आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फटकेबाजी केलीय. दुसऱ्या षटकात विकेट गमावल्यानंतर निसांका पथून आणि कुसल मेंडिस यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना जेरीस आणले. मेंडिसने श्रीलंकेकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक झळकावले. त्याला सदीरा समराविक्रमाची साथ मिळाली. ही दुसरी शतकी भागीदारी तोडण्यासाठी पाकिस्तानने चिटींग केल्याचा आरोप होतोय... १२२ धावा करणाऱ्या मेंडिसने बाद होण्यापूर्वी दोन खणखणीत षटकार खेचले होते. त्यानंतर तसाच फटका मारताना इमाम-उल-हकने सीमारेषेवर झेल टिपला. पण, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आणि त्यात इमामने बाऊंड्री लाईन मागे ढकलल्याचा आरोप केला गेलाय...
PAK vs SL Live : पाकिस्तानची धुलाई, कुसल मेंडिसने झळकावले वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान शतक
हसन अलीने दुसऱ्याच षटकात सलामीवीर कुसल परेराला ( ०) माघारी पाठवले. शाहीन आफ्रिदीचा फॉर्म आजही हरवलेला दिसला. मेंडिस आणि पथूम निसांका यांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १०२ धावांची भागीदारी केली. निसांका ५१ धावांवर झेलबाद झाला. निसांका आणि मेंडिस यांच्यातील १०२ धावांची भागीदारी ही वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेकडून झालेली सर्वोत्तम ठरली. यापूर्वी दिनेश मेंडिस व अर्जुन रणतुंगा यांनी १९८७मध्ये फैसलाबाद येथे ८० धावा जोडल्या होत्या. त्यानंतर मेंडिस आणि सदीरा समराविक्रमा यांनीही ६९ चेंडूंत १११ धावांची भागीदारी केली. ४ षटकांची पहिली स्पेल टाकून पुन्हा गोलंदाजीला आलेल्या शाहीनचे २५ षटकात मेंडिसने ४,४,४ असे स्वागत केले.
मेंडिसने ६५ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकार खेचून शतक पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेच्या फलंदाजानी केलेले हे वेगवान शतक ठरले. त्याने कुमार संगकाराचा २०१५च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ( ७० चेंडू वि. इंग्लंड) विक्रम मोडला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सहावे वेगवान शतक ठरले. एडन मार्करामने काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध ४९ चेंडूंत शतक झळकावले होते. मेंडिस ७७ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह १२२ धावांवर बाद झाला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकन फलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. रोशन महानामाने १९८७मध्ये ८९ धावा केल्या होत्या. त्यानंतर चरिथ असलंका ( १) याला हसन अलीने बाद करून श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला.