ICC ODI World Cup PAK vs SL Live : हैदराबादमधील जंगी स्वागत पाहून भारावलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी येथील बिर्याणी खावून खेळ मंदावल्याचं भाष्य केलं होतं. आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध त्यांचा खेळ पाहून 'बिर्याणी' मुळे ते सुस्तावले असावेत, असे वाटले. शाहीन आफ्रिदी, हॅरीस रौफ, हसन अली व शादाब खान या प्रमुख गोलंदाजांना श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगलेच झोडले. निसांका पथूम, कुसल मेंडिस आणि सदीरा समराविक्रमा यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना जेरीस आणले. मेंडिस व समराविक्रमा यांनी वैयक्तित शतक झळकावताना अनेक विक्रम मोडले.
PAK vs SL Live : पाकिस्तानी खेळाडूने बाऊंड्री लाईन मागे ढकलली? म्हणून शतकवीर मेंडिसची विकेट मिळाली, Video
सलामीवीर कुसल परेरा ( ०) दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर मेंडिस आणि पथूम निसांका ( ५१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १०२ धावांची भागीदारी केली. ही वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेकडून झालेली सर्वोत्तम ठरली. मेंडिस आणि सदीरा समराविक्रमा यांनीही ६९ चेंडूंत १११ धावांची भागीदारी केली. ४ षटकांची पहिली स्पेल टाकून पुन्हा गोलंदाजीला आलेल्या शाहीनचे २५ षटकात मेंडिसने ४,४,४ असे स्वागत केले. मेंडिसने ६५ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकार खेचून शतक पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेच्या फलंदाजानी केलेले हे वेगवान शतक ठरले.
मेंडिस ७७ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह १२२ धावांवर बाद झाला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकन फलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाची ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. कुमार संगकाराने २०१५मध्ये स्कॉटलंडविरुद्ध १२४ धावा केल्या होत्या. चरिथ असलंका ( १) अपयशी ठरला. समराविक्रमाने पाचव्या विकेटसाठी धनंजया डी सिल्वासह ( २५) ६५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला पुन्हा ट्रॅकवर आणले. समराविक्रमानेही ८२चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने पहिले शतक झळकावले. हसन अलीने ( ४-७१) चौथी विकेट घेताना ८९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०८ धावा करणाऱ्या समराविक्रमाला बाद केले.
पाकिस्तानने शेवटच्या १० षटकांत चांगले पुनरागमन केले. हॅरीसने ५०व्या षटकात १ धाव देत २ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने ९ बाद ३४४ धावा उभ्या केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०१९मध्ये भारताने ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या आणि तो विक्रम आज मोडला गेला.
Web Title: ICC ODI World Cup PAK vs SL Live : Kusal Mendis ( 122), Sadeera Samarawickrama ( 108), Pathum Nissanka ( 51), Sri Lanka post the total of 344/9
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.