Join us  

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विश्वविक्रमी विजय! मोहम्मद रिझवान, अब्दुल्लाह शफिक यांचे वैयक्तिक शतक

ICC ODI World Cup PAK vs SL Live : पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:22 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs SL Live : पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी विजयाची नोंद केली. ३४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दोन प्रमुख फलंदाज ३७ धावांवर माघारी परतले होते. तरीही  मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) व २३ वर्षीय अब्दुल्लाह शफिक ( Abdullah Shafique)  यांच्या विक्रमी भागीदारी आणि वैयक्तिक शतकांच्या जोरावर पाकिस्तानने विजय खेचून आणला. वर्ल्ड कप पदार्पणात शतक झळकावणारा शफिक हा पहिला पाकिस्तानी ठरला, तर पाठीच्या दुखापतीने अन् पायाला क्रँम्प येऊनही रिझवान खेळपट्टीवर उभा राहिला आणि वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात ४ शतक झळकले गेल्याची ही पहिलीच वेळ ठरलीय. 

Dhoniच्या तालमित घडलेल्या गोलंदाजाने पाकिस्तानला धक्का दिला, हेमंथाने अविश्वसनीय झेल टिपला, Video

श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंकाने पाकिस्तानच्या इमाम-उल-हक ( १२) आणि बाबर आजम ( १०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद रिझवान व अब्दुल्लाह शफिक यांनी पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. शफिकने वर्ल्ड कप पदार्पणात ९७ चेंडूंत शतक झळकावले आणि असा पराक्रम करणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला. श्रीलंकेच्या कर्णधाराने गोलंदाजीत बदल करताना मतिषा पथिराणाला गोलंदाजीला आणले आणि त्याने ३४व्या षटकात पाकिस्तानला धक्का दिला. शफिक १०३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११३ धावांवर झेलबाद झाला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या हेमंथाने पॉईंटला अप्रतिम झेल घेतला.  

रिझवानसोबत त्याची १७६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. वर्ल्ड कपमधील पाकिस्तानकडून ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. सईद अन्वर-वस्ती यांनी १९९९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९४ धावा केल्या होत्या. रिझवानची पाठ दुखत होती, पायाला क्रँम्प आला होता तरीही तो मैदानावर उभा राहिला. रिझवानने ९७ चेंडूंत शतक पूर्ण केले. वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा रिझवान हा पाकिस्तानचा दुसरा यष्टिरक्षक ठरला. २०१५ मध्ये सर्फराज अहमदने आयर्लंडविरुद्ध नाबाद १०१ धावा केल्या होत्या.  सौद शकील ३१ धावांचे योगदान देऊन माघारी परतला, परंतु तोपर्यंत पाकिस्तान विजयाच्या दारावर पोहोचला होता. ३० चेंडूंत ३१ धावा पाकिस्तानला करायच्या होत्या आणि ६ विकेट्स हातात होत्या. इफ्तिखार अहदमने १० चेंडूंत झटपट २२ धावा केल्या. पथिराणाने टाकलेल्या ४८व्या षटकात दोघांनी १९ धावा कुटल्या. रिझवानने १२१ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १३४ धावा केल्या आणि पाकिस्तानने ४८.२ षटकांत ६ विकेट्स राखून सामना जिंकला. 2011 मध्ये आयर्लंडने ३२९ धावांचा इंग्लंडविरुद्ध यशस्वी पाठलाग केला होता.

तत्पूर्वी, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३४४ धावा केल्या. कुसल मेंडिस आणि पथूम निसांका ( ५१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १०२ धावांची भागीदारी केली.  तिसऱ्या विकेटसाठी मेंडिस आणि सदीरा समराविक्रमा यांनीही ६९ चेंडूंत १११ धावांची भागीदारी केली. मेंडिस ७७ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह १२२ धावांवर बाद झाला. त्याने श्रीलंकेकडून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान शतक झळकावले. समराविक्रमाने ८९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०८ धावा केल्या. श्रीलंकेने ९ बाद ३४४ धावा उभ्या केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रीलंकापाकिस्तान