ICC ODI World Cup : बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ वर्ल्ड कप २०२३ मध्ये विजयासाठी तरसला आहे, कारण त्यांना सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. एकापाठोपाठ एक निराशाजनक कामगिरी करून ते त्यांच्या चाहत्यांना नाराज करत आहेत. पण, भारताच्या दौऱ्यावर त्यांची जंगी मौज सुरू आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत बिर्याणीचा आस्वाद घेतला आहे आणि ३१ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्धच्या लढतीपूर्वी त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये उपलब्ध जेवणापेक्षा बिर्याणीला प्राधान्य दिले. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी खेळाडूंनी कोलकाताच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून बिर्याणीबरोबरच चाप , फिर्नी, कबाब आणि शाहिद टुकडा ऑर्डर केला होता.
पाकिस्तानचा संघ २८ ऑक्टोबरला कोलकाता येथे दाखल झाला होता. खेळाडूंनी त्यांच्या आगमनावेळी मिष्टी दही, मिठाई खाल्ली. हॉटेलचा एक मजला पाकिस्तान संघाला देण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी सुरक्षा व्यवस्थेत नियुक्त केलेल्या सर्व्हिस बॉईजनाच त्या मजल्यावर परवानगी आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने २९ ऑक्टोबर रोजी एक दिवसाची सुट्टी घेतली होती. त्यांनी हॉटेलमध्ये विविध प्रकारचे हलाल मांस घेऊन उशीरा नाश्ता केला होता.
बांगलादेशला नेदरलँड्सकडून कोलकाताच्या ईडन गार्डनवर मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण, कर्णधार शाकिब अल हसनने पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तान सध्या सहा सामन्यांतून केवळ दोन विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बांगलादेश सहा सामन्यांतून पाच पराभवांसह नवव्या स्थानावर आहे.