Join us  

तू हो पुढे, मी आलोच! इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत परतण्याची घाई, ७ बाद ८८ अशी अवस्था, Video 

ICC ODI World Cup SA vs ENG Live : अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या इंग्लंडचे मानसिक खच्चीकरण झालेले दिसतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 8:04 PM

Open in App

ICC ODI World Cup SA vs ENG Live : अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या इंग्लंडचे मानसिक खच्चीकरण झालेले दिसतेय... दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात गोलंदाजांनी मार खाल्लाच... शिवाय फलंदाजांमध्ये तंबूत परतण्याची घाई दिसली. 

रिझा हेंड्रीक्स ( ८५) व  रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ६०) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीने आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले.  कर्णधार एडन मार्कराम ( ४२) ने चांगली फटकेबाजी केली. हेनरिच क्लासेन व मार्को यानसेन यांचे वादळ वानखेडेवर घोंगावले. क्लासेन व यानसेन यांनी ७७ धावांत १५१ धावांची भागीदारी केली. क्लासेन ६७ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारासह १०९ धावांवर त्रिफळाचीत झाला.  आफ्रिकेने ७ बाद ३९९ धावा केल्या. यानसेन ४२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेने २००९मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ बाद ३५४ धावा केल्या होत्या आणि तो विक्रम आज मोडला गेला. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध २०१९मध्ये पाकिस्तानने ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या आणि ती सर्वोत्तम धावसंख्या होती. आज आफ्रिकेने तोही विक्रम मोडला.  

इंग्लंडला हा दबाव पेलवताना दिसला नाही. लुंगी एनगिडीने तिसऱ्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला ( १०) माघारी पाठवले. फलंदाजीत अमुल्य योगदान देणाऱ्या मार्को यानसेनने नंतर कमाल केली. त्याने डेव्हिड मलान ( ६) व जो रूट ( २) यांना माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद २४ अशी दयनीय केली. इंग्लंडची पडझड इथेच थांबली नाही. आज वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळणारा बेन स्टोक्स ( ५) कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. हॅरी ब्रुक ( १५) व कर्णधार जोस बटरल ( १५) हे गेराल्ड कोएत्झीच्या गोलंजीवर मान टाकून तंबूत परतले. कोएत्झीने आणखी एक धक्का देताना आदील राशीदला ( १०) माघारी पाठवले. इंग्लंडची अवस्था ७ बाद ८८ अशी दयनीय झाली. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपइंग्लंडद. आफ्रिका