ICC ODI World Cup SA vs ENG Live : धक्कादायक पराभवानंतर इंग्लंड-दक्षिण आफ्रिका संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर समोरासमोर आले. इंग्लंडला अफगाणिस्तानने आणि आफ्रिकेला नेदरलँड्सने पराभूत केले होते. त्यामुळे आज दोन्ही संघ विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक आहेत. पण, पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेचा खेळ भारी पडल्याचे दिसला. रिझा हेंड्रीक्स व रॅसी व्हॅन डेर ड्युसेनच्या महत्त्वपूर्ण भागीदारीनंतर हेनरिच क्लासेनने अखेरच्या षटकांत आतषबाजी केली. मार्को यानसेनची त्याला चांगली साथ मिळाली आणि इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभं केलं गेलं.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि रिसे टॉप्लीने दुसऱ्याच चेंडूवर क्विंटन डी कॉक ( ४) बाद केले. पण, त्यानंतर टेम्बा बवुमाच्या जागी संधी मिळालेल्या रिझा हेंड्रीक्स व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी सावरले. दोघांच्या १२१ धावांच्या भागीदारीने आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले. आदील राशीदने ड्युसेनला ( ६०) माघारी पाठवून ही जोडी तोडली. पाठोपाठ त्याने हेंड्रीक्सचाही त्रिफळा उडवला. हेंड्रीक्सने ७५ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८५ धावा चोपल्या.
टॉप्ली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता, परंतु पुन्हा मैदानावर येऊन त्याने दोन विकेट्स घेतल्या. कर्णधार एडन मार्कराम ( ४२) व डेव्हिड मिलर ( ५) यांना त्याने माघारी पाठवले. हेनरिच क्लासेन चांगली फटकेबाजी करताना दिसला. क्लासेन व मार्को यानसेन यांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. क्लासेनने ६१ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह शतक पूर्ण केले. यानसेननेही ३६ चेंडूंत फिफ्टी ठोकली. क्लासेन व यानसेन यांनी ७७ धावांत १५१ धावांची भागीदारी केली. क्लासेन ६७ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारासह १०९ धावांवर त्रिफळाचीत झाला. आफ्रिकेने ७ बाद ३९९ धावा केल्या. यानसेन ४२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेने २००९मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ बाद ३५४ धावा केल्या होत्या आणि तो विक्रम आज मोडला गेला. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध २०१९मध्ये पाकिस्तानने ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या आणि ती सर्वोत्तम धावसंख्या होती. आज आफ्रिकेने तोही विक्रम मोडला.