Join us  

क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचे जनक लाजीरवाण्या पद्धतीने हरले! दक्षिण आफ्रिकेने मैदान मारले

ICC ODI World Cup SA vs ENG Live : मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि आज त्याच पंढरीत क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव चाहत्यांना पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 8:34 PM

Open in App

ICC ODI World Cup SA vs ENG Live : मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि आज त्याच पंढरीत क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव चाहत्यांना पाहायला मिळाला. गतविजेत्यांचे ओझे घेऊन भारतात दाखल झालेल्या इंग्लंडला मागील सामन्यात अफगाणिस्तानने पराभवाचा धक्का दिला. आधीच भेदरलेल्या इंग्लंडचे मानसिक खच्चीकरण त्या सामन्यातून झाले आणि आज दक्षिण आफ्रिकेने त्यांचे वस्त्रहरण केले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आफ्रिकेची कामगिरी आज अव्वल राहिली. 

 तू हो पुढे, मी आलोच! इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत परतण्याची घाई, ७ बाद ८८ अशी अवस्था, Video 

४०० धावांच्या लक्ष्याच्या दबावाखाली इंग्लंडचा संघ पूर्णतः दबला... लुंगी एनगिडीने तिसऱ्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला ( १०) माघारी पाठवले. त्यानंतर मार्को यानसेनने डेव्हिड मलान ( ६) व जो रूट ( २) यांना माघारी. इंग्लंडची पडझड इथेच थांबली नाही. बेन स्टोक्स ( ५) कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. हॅरी ब्रुक ( १५) व कर्णधार जोस बटरल ( १५) हे गेराल्ड कोएत्झीच्या गोलंजीवर मान टाकून तंबूत परतले. कोएत्झीने आणखी एक धक्का देताना आदील राशीदला ( १०) माघारी पाठवले. इंग्लंडची अवस्था ७ बाद ८८ अशी दयनीय झाली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत १९९९नंतर प्रथमच इंग्लंडने पहिले ४ फलंदाज १० षटकांत गमावले.  गुस अॅटकिसन व मार्क वूड यांनी औपचारिकता म्हणून चांगली फटकेबाजी केली आणि इंग्लंडला शंभरी गाठून दिली. इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळता आला असता, परंतु त्यांच्याकडून तीन झेल सुटले. ते थोडे अवघडच होते. अॅटकिसन व वूड यांनी २७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून सर्वांना अचंबित केले. रबाडाच्या एका षटकात अॅटकिसनने १८ धावा चोपल्या. वूडने २२व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर ४,६,०,६,६,१ अशी फटकेबाजी केली. पण, शेवटच्या चेंडूवर महाराजने अॅटकिसनचा ( ३५) त्रिफळा उडवला. त्याची आणि वूडची ३३ चेंडूंत ७० धावांची भागीदारी संपुष्टात आली. वूड १७ चेंडूंत ४३ धावांवर नाबाद राहिला. रिसे टॉप्ली दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही आणि इंग्लंड १७० धावांवर ऑल आऊट झाले. आफ्रिकेने २२९ धावांनी मॅच जिंकली.  

तत्पूर्वी, रिझा हेंड्रीक्स ( ८५) व  रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ६०) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीने आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले.  कर्णधार एडन मार्कराम ( ४२) ने चांगली फटकेबाजी केली. हेनरिच क्लासेन व मार्को यानसेन यांचे वादळ वानखेडेवर घोंगावले. क्लासेन व यानसेन यांनी ७७ धावांत १५१ धावांची भागीदारी केली. क्लासेन ६७ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारासह १०९ धावांवर त्रिफळाचीत झाला.  आफ्रिकेने ७ बाद ३९९ धावा केल्या. यानसेन ४२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपइंग्लंडद. आफ्रिका