ICC ODI World Cup SA vs NED Live : दक्षिण आफ्रिकेची यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी सर्वांना अचंबित करणारी आहे. फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडींवर आफ्रिकेने कमाल करून दाखवली आहे. आज नेदरलँड्सविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी ते मैदानावर उतरले आहेत. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आज टिच्चून मारा करताना नेदरलँड्सच्या धावांचा ओघ आटवला होता. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने ( Scott Edwards ) एकट्याने किल्ला लढवून सन्मानजनक धावसंख्या उभारल्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे ४३-४३ षटकांचा हा सामना खेळवण्याचा निर्णय झाला आणि आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओडॉड यांनी सावध सुरुवात केली, परंतु कागिसो रबाडाने सातव्या षटकात पहिला धक्का दिला. विक्रमजीत २ धावांवर माघारी परतल्यानंतर पुढच्याच षटकात मॅक्सला ( १८) मार्को यानसनने बाद केले. रबाडाने दिवसाची दुसरी विकेट घेताना बॅस डी लीडला पायचीत केले. गेराल्ड कोएत्झी आणि लुंगी एनगीडी यांनी प्रत्येकी १ विकेट घेत नेदरलँड्सचा निम्मा संघ ८२ धावांवर तंबूत पाठवला.
सायब्रँड इगलब्रेच ( १९), तेजा निदामानुरू ( २०) यांचा संघर्षही आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मोडून काढला. लॉगन व्हॅन बीक ( १०) आज फेल झाला. स्कॉट एडवर्ड्सने एकट्याने किल्ला लढवला. त्याला दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू रोएलॉफ व्हॅन डेर मर्वेने दमदार साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ३० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. एनगिडीने ३७ चेंडूंत ६४ धावांची ही भागीदारी तोडली. मर्वे १९ चेंडूंत २९ धावांवर झेलबाद झाला. आर्यन दत्तने ९ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २३ धावा केल्या. एडवर्डस ६९ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला. नेदरल्ँड्सने ४३ षटकांत ८ बाद २४५ धावा केल्या.
गुणतालिकेत बदल होणार?
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ सामने जिंकले आहेत. भारतीय संघ १.८२१ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचा नेट रन रेट हा १.६०४ असा आहे. दक्षिण आफ्रिकेने दोनच सामने जिंकले आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट २.३६० असा आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास ते सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल होतील.
Web Title: ICC ODI World Cup SA vs NED Live : NETHERLANDS SCORED 245/8 AGAINST SOUTH AFRICA,captain Scott Edwards ( 78*) showcases masterclass with his 14th ODI fifty,
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.