ICC ODI World Cup SA vs NZ Live : शेवटचा वन डे वर्ल्ड कप खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला ( Quinton de Kock ) रोखणं गोलंदाजांची तगडी फौज असलेल्या संघांनाही अशक्य झालेय... न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराने यंदाच्या वर्ल्ड कपमधील चौथे शतक झळकावले. त्याने आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी दोनशे धावांची भागीदारी केली. डेर ड्युसेन यानेही शतक झळकावले. त्याने शेवटच्या षटकांत डेव्हिड मिलरसह अक्षरशः वादळ आणले होते. आफ्रिकेने आणखी एकदा तीनशेपार धावांचा डोंगर उभा केला.
क्विं'टन'! डी कॉकचे चौथे शतक; वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून रेकॉर्ड ब्रेकींग खेळी
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार टेम्बा बवुमा( २४) ९व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर क्विंटन व व्हॅन डेर ड्युसन यांनी डाव सावरला. क्विंटनने १०३ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि यंदाच्या पर्वात ५००+ धावा करणाऱ्या फलंदाजाचा पहिला मान पटकावला. त्याने डेर ड्युसेनसह शतकी भागीदारी पूर्ण केली आणि या वर्ल्ड कपमधील आफ्रिकन फलंदाजांकडून ही सातवी शतकी भागीदारी ठरली. यापैकी ५मध्ये क्विंटनचा सहभाग आहे. क्विंटनने षटकार खेचून यंदाच्या पर्वातील चौथे शतक पूर्ण केले. वर्ल्ड कपच्या एका पर्वात ४ किंवा त्याहून अधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये क्विंटनचा समावेश झाला आहे.
मिलरने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मिलरने ३० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ४ बाद ३५७ धावा केल्या.