Join us  

SA vs SL : दे दना दन! एकाच सामन्यात ३ सेन्चुरी; एडन मार्करमने ठोकलं वर्ल्ड कपमधील वेगवान शतक 

ICC ODI World Cup SA vs SL : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आज दिल्ली दणाणून सोडली..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 6:07 PM

Open in App

ICC ODI World Cup SA vs SL : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आज दिल्ली दणाणून सोडली... श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी वैयक्तिक शतक झळकावताना विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर एडन मार्करमने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान शतक नोंदवले आणि १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एका इनिंग्जमध्ये तीन शतकं झळकली गेली आहेत.

 नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय श्रीलंकेचा चांगलाच महागात पडला. कर्णधार टेम्बा बवुमाला ( ८) दिलशान मधुशंकाने दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले. पण, त्यांना दुसऱ्या विकेटसाठी ३१व्या षटकाची वाट पाहावी लागली. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक या जोडीने १७४ चेंडूंत २०४ धावांची भागीदारी केली. मथीशा पथिराणाने ही जोडी तोडली. क्विंटन ८४ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०० धावांवर झेलबाद झाला. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेकडून शतक झळकावणारा क्विंटन हा दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. २०११ला एबी डिव्हिलियर्सने नेदरलँड्सिरुद्ध १३४ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०७ धावा केल्या होत्या.  डेर ड्युसेन ११० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांवर बाद झाला. 

दोन सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर हेनरिच क्लासेन आणि एडन मार्करम यांनी वादळी फटकेबाजी केली. आफ्रिकेने ४० षटकांत ३ बाद २९१ धावांपर्यंत मजल मारली होती. क्लासेन आणि मार्करम यांनी ३० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली, तर ३४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मार्करमने पथिराणाच्या एका षटकात २६ धावा चोपल्या. कासून रजिथाच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्लासेन ३२ धावांवर झेलबाद झाला आणि मार्करमसोबत त्याची ७८ ( ३६ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. मार्करामने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे वेगवान शतक ठरले. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ४२८ धावांचा डोंगर उभा केला. 

डेव्हिड मिलर ( ३९) आणि मार्को यानसेन ( १२ यांनीही चांगली फटकेबाजी केली आणि भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपद. आफ्रिकाश्रीलंका