ICC ODI World Cup SA vs SL : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आज नवी दिल्लीत झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्या लढतीत प्रेक्षकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित प्रेक्षकांना दोन्ही संघांनी निराश केले नाही आणि दोघांनी मिळून ७५४ धावा कुटल्या अन् वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात नवा विक्रम नोंदवला. आफ्रिकेच्या ५ बाद ४२८ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने ३२६ धावांपर्यंत मजल मारून उल्लेखनीय कामगिरी केली. आफ्रिकेने १०२ धांनी हा सामना जिंकून पाकिस्तानला मोठा फटका दिला अन् उद्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीपूर्वी टीम इंडियाला डबल चॅलेंज दिलंय.
शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? रोहित शर्माने दिले मोठे अपडेट
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय श्रीलंकेचा चांगलाच महागात पडला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १०८) आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक ( १००) या जोडीने १७४ चेंडूंत २०४ धावांची भागीदारी केली. एडन मार्करमने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने आज ५ बाद ४१९ धावा चोपल्या आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात, श्रीलंकेकडून कुसल मेंडिस ( ७६), चरिथ असलंका ( ७९) आणि कर्णधार दासून शनाका ( ६८) यांनी अर्धशतकी खेळी केली. दासून असेपर्यंत श्रीलंकेच्या विजयाच्या आशा कायम होत्या, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना श्रेय द्यायला हवं. त्यांनी योग्य मारा करताना श्रीलंकेला मोक्याच्या क्षणी धक्के दिले. कसुन रजिथाने ३३ धावा केल्या. आफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मार्को यानसेन, कागिसो रबाडा व केशव महाराज यांना प्रत्येकी २ बळी मिळाली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ४४.५ षटकांत ३२६ धावांत तंबूत परतला.
गुणतालिकेत फेरबदल...
दक्षिण आफ्रिकेने आजच्या विजयासह गुणतालिकेत फेरबदल केले. न्यूझीलंडने वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून २.१४९ नेट रन रेटसह अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तानने नेदरलँड्सला नमवून १.६२० नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती, परंतु आफ्रिकेने आज १०२ धावांनी विजय मिळवला. त्यांच्या या विजयाने त्यांचा नेट रन रेट हा २.०४० इतका झाला अन् ते दुसऱ्या क्रमांकावर आले. पाकिस्तान तिसऱ्या व बांगलादेश १.४३८ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहेत. भारताला टॉपर बनायचे असेल तर उद्या ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवावा लागणार आहे.
Web Title: ICC ODI World Cup SA vs SL : SOUTH AFRICA DEFEATED SRI LANKA BY 102 RUNS, Move to number 2 on Point Table, Pakistan slip into 3rd, double challenge for india against australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.