Join us  

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आज दिल्लीचे मैदान गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 10:21 PM

Open in App

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आज दिल्लीचे मैदान गाजवले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या... वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक अन् वर्ल्ड कपच्या एकाच इनिंग्जमध्ये तीन शतकं... असे अनेक विक्रम आफ्रिकेने नावावर करताना श्रीलंकेवर विजय मिळवला. ४२८ धावा डोळ्यासमोर असताना श्रीलंका सहज शरणागती पत्करतील असे वाटले होते, परंतु त्यांनीही चांगला संघर्ष केला.  या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ७२०+ धावा केल्या आणि वर्ल्ड कप इतिहासातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०१९मध्ये ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामन्यात ७१४ धावा झाल्या होत्या.  

वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ते वेगवान शतक; दक्षिण आफ्रिकेचा विक्रमांचा पाऊस

फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर श्रीलंकेकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती, परंतु पथूम निसंका ( ०)  मार्को यानसेनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. कुसल मेंडिसने ५व्या षटकात ३ खणखणीत षटकार खेचून श्रीलंकेच्या चाहत्यांना खूश केले. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावताना ३ चौकार व ६ षटकार खेचले. वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकन फलंदाजाचे हे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. मार्कोने अप्रतिम चेंडूवर परेराचा ( ७) त्रिफळा उडवला.  मेंडिसला तिसऱ्या विकेटच्या भागीदारीसाठी सदीरा समरविक्रमाची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी २८ चेंडूंत ४२ धावा जोडल्या. रबाडाने वेगवाने चेंडूवर अखेर मोठी विकेट मिळवली. मेंडिस ४२ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ७६ धावांवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन परतला. त्यापाठोपाठ गेराल्ड कोएत्झीने श्रीलंकेच्या समरविक्रमाला ( २३) संथ चेंडूवर झेल देण्यास भाग पाडले.

 

या विकेटनंतर श्रीलंकेच्या धावगती किंचितशी मंदावली आणि आफ्रिकेकडून फिरकीचा मारा सुरू झाला. धनंजया डी सिल्वा ( ११) हा केशव महाराजच्या फिरकीवर झेलबाद झाला अन् श्रीलंकेचा निम्मा संघ १५० धावांत तंबूत परतला. चरिथ असलंकाचा ४५ धावांवर डेर ड्युसेनने सोपा झेल टाकला. चरिथने ४६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.  श्रीलंकेच्या फलंदाजांचा आत्मविश्वास पासून ते हे लक्ष्य पार करतील असे वाटत होते. पण, लुंगी एनगिडीच्या चेंडूवर चरिथाने ( ७९) मारलेला फटका फसला अन् रिझा हेड्रींक्सने अप्रतिम झेल घेतला. पाठोपाठ कोएत्झीने श्रीलंकेला सातवा धक्का देताना दुनिथ वेल्लालागेची ( ०) विकेट मिळवली.  दासून शनाकाने ३७व्या षटकात ६,४,४,४,४,१ अशी फटकेबाजी करून श्रीलंकेच्या ताफ्यात उत्साह निर्माण केला. पण, केशव महाराजाने विकेट मिळवली. दासून ६८ धावांवर त्रिफाळाचीत झाला.  कोएत्झीने आणखी एक विकेट मिळवताना कसुन रजिथाला ( ३३) बाद केले.  श्रीलंकेने ४४.५ षटकांत सर्वबाद ३२६ धावा केल्या आणि आफ्रिकेने १०२ धावांनी सामना जिंकला. 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय श्रीलंकेचा चांगलाच महागात पडला.  रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १०८) आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक ( १००) या जोडीने १७४ चेंडूंत २०४ धावांची भागीदारी केली. एडन मार्करमने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने आज ५ बाद ४१९ धावा चोपल्या आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा केल्या होत्या.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रीलंकाद. आफ्रिका