ICC ODI World Cup PAK vs BAN Live : ४ पराभवानंतर पाकिस्तान संघाची गाडी विजयीपथावर आली आणि त्यांच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला. पाकिस्ताननेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद करताना उपांत्य फेरीतील आव्हान कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध त्यांनी दणदणीत विजय मिळवून नेट रन रेट सुधारला, परंतु ती १५ अतिरिक्त चेंडू त्यांचा घात करणार आहे. पाकिस्तान आता ६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आला आहे आणि त्यांना उर्वरित दोन लढतीत न्यूझीलंड ( ४ नोव्हेंबर) व इंग्लंड ( ११ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. पाकिस्तानने ३२.३ षटकांत हा विजय मिळवला, पण इथेच त्यांची चूक झाली.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ ४५.१ षटकांत २०४ धावांवर तंबूत परतला. त्यांच्याकडून लिटन दास ( ४५), महमुदुल्लाह ( ५६) व शाकिब अल हसन ( ४३) यांनी चांगला खेळ केला. मेहिदी हसन मिराजनेही २५ धावांचे योगदान दिले. शाहीन, मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर हॅरीस रौफने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात फखर जमान आणि अब्दुल्लाह शफीक यांनी १२८ धावांची भागीदारी केली. शफीक ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर पायचीत झाला. जमानने ७४ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ८१ धावा केल्या. इफ्तिखार अहमद ( १७) आणि मोहम्मद रिझवान ( २६) यांनी आक्रमक फटकेबाजी करून पाकिस्तानचा विजय पक्का केला.
पाकिस्तानने ३२.३ षटकांत ३ बाद २०५ धावा करून मॅच जिंकली. पाकिस्तानने हा सामना ३० षटकांच्या आत जिंकला असता तर त्यांचा नेट रन रेट +०.०२० झाला असता, परंतु १५ चेंडू अतिरिक्त घेतल्याने त्यांचा नेट रन रेट -०.०२४ असा राहिला आणि उपांत्य फेरीच्या संघर्षात हिच गोष्ट पुढे महत्त्वाची ठरणार आहे. सामन्यानंतर फखर जमान यानेही ही चिंता व्यक्त करून दाखवली. हा सामना ३० षटकांत संपवण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे त्याने मान्य केले.
वर्ल्ड कप उपांत्य फेरीत कोणाला किती संधी
भारत - ९९.९ %
दक्षिण आफ्रिका - ९५ %
न्यूझीलंड - ७५ %
ऑस्ट्रेलिया - ७४ %
अफगाणिस्तान - ३१ %
पाकिस्तान - १३ %
श्रीलंका - ६ %
नेदरलँड्स - ५.८ %
इंग्लंड - ०.३ %
बांगलादेश - आव्हान संपुष्टात
Web Title: ICC ODI World Cup Semi Finals chances: Pakistan moved to 5th Place in the Points Table with -0.02 NRR in this World Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.