ICC ODI World Cup ENG vs SL Live : श्रीलंकेने २००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून सुरू असलेली परंपरा कायम राखताना इंग्लंडला पराभूत केले. २००७, २०११, २०१५, २०१९ आणि २०२३ मध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेने इंग्लंडवर सहज विजय मिळवला आहे. १९९६नंतर इंग्लंड वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच सलग तीन सामने हरला आहे. श्रीलंकेने २५.४ षटकांत ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत आगेकूच केलीच शिवाय नेट रन रेटही प्रचंड सुधारला.
इंग्लंडने बिनबाद ४५ वरून संपूर्ण संघ ३३.२ षटकांत १५६ धावांत गमावले. १११ धावांत इंग्लंडने १० गडी गमावले. बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ ( ७३ चेंडू) धावा केल्या. जॉनी बेअरस्टो ( ३०) व डेविड मलान ( २८) यांनी सुरुवात चांगली केली होती. पण, त्यानंतर लाईन लागली. मोईन अली ( १५) व डेव्हिड विली ( १४) यांनीही दुहेरी आकडा गाठला. लाहिरु कुमारा ( ३-३५), कसून रजिथा ( २-३६), पुनरागमन करणारा अँजेलो मॅथ्यूज ( २-१४) आणि महीश थीक्षणा ( १-२१) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
श्रीलंकेने आजच्या विजयासह नेट रन रेटमध्ये ( -०.२०५) सुधारणा करताना पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आणि पाकिस्तानला ( -०.४००) सहाव्या क्रमांकावर ढकलले. इंग्लंडचा नेट रन रेट ( -१.६३४) आणखी पडला आणि ते नवव्या क्रमांकावर गेले. बांगलादेश ( -१.२५३) आणि अफगाणिस्तान ( -०.९६९) हे त्यांच्या पुढे आहेत. श्रीलंकेला पुढील ४ सामन्यांत अफगाणिस्तान, भारत, बांगलादे व न्यूझीलंडचा सामना करायचा आहे आणि त्यांना सेमी फायनलमध्ये ४ सामने जिंकून प्रवेश करण्याची संधी आहे.