नवी दिल्ली - '२०१९च्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडला सुपर ओव्हरमध्ये ओव्हर थ्रोमध्ये ६ धावा देण्याची चूक निर्णायक ठरली. ही चूक अनवधानाने घडली होती. पण, यामुळे इंग्लंड विश्वविजेते ठरले,' अशी कबुली माजी दिग्गज पंच मराइस इरास्मस यांनी दिली. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.
२०१९चा विश्वचषक अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर इंग्लंड - न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. इंग्लंडला ३ चेंडूंत ९ धावांची गरज असताना बेन स्टोक्सने स्वत:ला धावबाद होण्यापासून रोखण्यासाठी सूर मारला. पण, यावेळी चेंडू त्याच्या बॅटला लागून सीमापार गेला. मैदानी पंच कुमार धर्मसेना यांनी आपले सहकारी इरास्मस यांच्याशी चर्चा करत इंग्लंडला ६ धावा बहाल केल्या. पण, नंतर यावेळी इंग्लंडला केवळ ५ धावाच दिल्या पाहिजे होत्या, हे स्पष्ट झाले. कारण, ज्यावेळी थ्रो झाला, तेव्हा फलंदाजाने दुसऱ्या धावेसाठी क्रीझ पार केली नव्हती. यावेळी तिसऱ्या पंचांसोबत झालेल्या चर्चेनंतरही सहा धावा देण्याचे निश्चित झाले होते.
इरास्मस यांनी सांगितले की, 'विश्वचषक २०१९च्या अंतिम सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी जेव्हा मी माझ्या हॉटेल रूममधून बाहेर पडलो, त्याचवेळी धर्मसेनाही त्यांच्या रूममधून बाहेर आले. त्यांनी सांगितले की, 'आपण एक मोठी चूक केली आहे, तुम्ही पाहिलं का?' त्याचवेळी मला याबाबत कळाले. पण, प्रत्यक्षात त्यावेळी मैदानावर आम्ही एकमेकांना या ६ धावा आहेत, असे म्हटले होते. फलंदाजाने क्रीझ पार केल्याचे तेव्हा कळले नव्हते.'
पंचगिरीबाबत इरास्मस म्हणाले की, 'कसोटीत पंचगिरी करणे मर्यादित षटकांच्या सामन्याच्या तुलनेत खूप कठीण आहे. कारण चार तास किंवा एकदिवसीय सामन्यांच्या ७-८ तासांमध्ये कोणती चूक झाली, तर ती लवकर विसरलीही जाते. पण, कसोटीत असे होत नाही. कसोटीत ऐकावे लागते की, पहिल्या दिवशी कसे निर्णय दिले होते आणि आता तिसऱ्या दिवशी कसे निर्णय देत आहेत. पण, मर्यादित षटकातील एका सामन्यात झालेली चूक कधीच विसरता येणार नाही. तो सामना म्हणजे २०१९ सालचा विश्वचषक अंतिम सामना.'