न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेल यानं ( Ajaz Patel) आयसीसीच्या डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. एजाझनं मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यातक १० विकेट्स घेत विश्वविक्रमाची नोंद केली होती. या पुरस्कारासाठी एजाझसह मयांक अग्रवाल व मिचेल स्टार्क हेही शर्यतीत होते, परंतु एजाझनं केलेली कामगिरी ही अविश्वसनीय होती आणि त्यामुळे त्याचा गौरव करण्यात आला.
भारताविरुद्धची दुसरी कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली. त्यात एजाझनं डावात १० विकेट्सह एकूण १४ विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावात १० विकेट्स घेणारा तो जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली