ICC World Cup 2023, SL vs NED : सध्या झिम्बाब्वेमध्ये भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहेत. यासाठी १० संघ रिंगणात असून अव्वल दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. आज झालेल्या सामन्यात आशियाई किंग्ज श्रीलंकेने नेदरलॅंड्सचा पराभव करून दोन गुण मिळवले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४७.४ षटकांत सर्वबाद २१३ धावा केल्या होत्या. धनंजय डी सिल्वा (९३) आणि डिमुथ करूणारत्ने (३३) यांच्या जोरावर श्रीलंकेने सन्मानजनक आव्हान उभारले.
२१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलॅंड्सच्या फलंदाजांना घाम फुटला. वेस्ली बारेसी (५२) आणि बेस डी लीडे (४१) यांनी संयमी खेळी करून विजयाच्या दिशेने कूच केली पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत नेदरलॅंड्सला धक्के दिले. पण कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नेदरलॅंड्ससाठी एकट्याने किल्ला लढवला. तो ६७ धावांवर नाबाद परतला पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
श्रीलंकेकडून महेश तीक्ष्णाने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर वानिंदू हसरंगा (२) आणि कर्णधार दासुन शनाका (१), लाहिरू कुमारा (१), दिलशान मदुशंका (१) यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. या विजयासह श्रीलंकेने भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आताच्या घडीला सहा गुणांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. खरं तर नवख्या नेदरलॅंड्सविरूद्ध विजय मिळवताना देखील श्रीलंकेला मोठा संघर्ष करावा लागला. २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडने १९२ धावा केल्या अन् श्रीलंकेने २१ धावांनी विजय साकारला.