आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (३० नोव्हेंबर) एकदिवसीय खेळाडूंचं रँकिंग जाहीर केली. यामध्ये भारतीय खेळाडूंना मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या शिखर धवनचीही क्रमवारीत घसरण झाली आहे.
धवनसोबतच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत मोठं नुकसान झालं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे न्यूझीलंड दौऱ्यावर गेले नव्हते. या दौऱ्यादरम्यान त्यांना विश्रांती देण्यात आली होती.
न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय क्रिकेट संघानं ०-१ अशी गमावली. या मालिकेतील दोन सामने पावसामुळे धुतले गेले. परंतु तिन्ही सामन्यांत धवननं फलंदाजी केली. यात त्याला केवळ १०३ धावा करता आल्या. या कामगिरीनंतर त्याला आपलं स्थान गमवावं लागलं आहे. या मालिकेनंतर धवन १५ व्या नंबरवर आला.
कोहली-रोहितलाही नुकसानटॉप-१० वनडे फलंदाजांमध्ये फक्त दोन भारतीयांचा समावेश आहे. हे खेळाडू म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली. दोघांनाही १-१ स्थानाचा फटका बसला आहे. कोहली आठव्या स्थानावर घसरला आहे, तर रोहित ९ व्या स्थानावर आला आहे. या दोघांनाही इंग्लिश खेळाडू जॉनी बेअरस्टोने मागे टाकले आहे. बेअरस्टोने दोन स्थानांची झेप घेतली असून तो ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा इमाम उल हक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिललाही फायदा झाला आहे. दोन स्थानांनी झेप घेत तो ३४ व्या क्रमांकावर आला आहे. २७ व्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस अय्यरलाही फायदा झाला आहे.