ICC Ranking : भारताचा अव्वल ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन ( R Ashwin ) चे ICC कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान संकटात सापडले आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विनचे ६ गुणांचे नुकसान झाले आहे. इंग्लंडचा ४० वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने संयुक्तरित्या आता पुन्हा नंबर वन स्थान पटकावले आहे.
अश्विन गेल्या आठवड्यात कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. इंदूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दोन्ही डावांत त्याने केवळ ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना नऊ गडी राखून जिंकला, २०१७ नंतर भारतीय भूमीवर त्यांचा पहिला विजय. अश्विनचे आता ८५९ गुण आहेत, जे अँडरसनसारखेच आहेत आणि ते संयुक्त अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि पाकिस्तानचा शाहिन आफ्रिदी हे फार मागे नाहीत. त्यामुळे नंबर वन साठीची स्पर्धा अधिक तीव्र झालेली दिसतेय.
वैयक्तिक कारणांमुळे सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन सामन्यांमधून बाहेर पडलेल्या कमिन्सचे ८४९ गुण आहेत आणि तो तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आठ विकेट घेणाऱ्या रबाडा तीन स्थानांची प्रगती करत ८०७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंदूरमध्ये ११ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लाएन पाच स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.