Deepti Sharma reaches career-high 2nd spot in ICC ODI bowlers rankings : भारतीय महिला संघातील स्टार खेळाडू दीप्ती शर्मा वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंगस दुसऱ्या स्थानावर विराजमान झालीये. भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंड महिला संघाविरुद्धच्या विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत व्यग्र आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दीप्तीनं लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीच्या जोरावरच तिने वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे झाला फायदा
मंगळवारी आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला गटातील नव्या एकदिवसीय महिला क्रमवारीनुसार, दोन स्थानांनी झेप घेत दीप्ती शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहचल्याचे दिसून येते. वनडेत महिला गोलंदाजीच्या क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ७७० गुणांसह अव्वलस्थानावर विराजमान आहे. दीप्ती आणि सोफी यांच्यात फक्त ८३ गुणांचा फरक आहे. भारतीय स्टार महिला क्रिकेटर नंबर वन ताजच्या अगदी जवळ पोहचल्याचे दिसते.
वनडे गोलंदाजीत नवी क्वीन होण्याच्या अगदी जवळ पोहचलीये दीप्ती
न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दीप्ती शर्मानं आपल्या खात्यात १ विकेट्स जमा केली होती. दुसऱ्या सामन्यात तिने दोन विकेट्स घेतल्या. या दोन सामन्यातील दमदार कामगिरीसह ती दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. तिसऱ्या सामन्यात दीप्तीनं ३ विकेट्स घेतल्या असून लवकरच ती वनडे गोलंदाजीतील नवी क्वीन ठरेल, असे दिसते.
आतापर्यंतची तिची ही सर्वोच्च कामगिरी
२७ वर्षीय दीप्ती शर्मानं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली होती. त्यानंतर आता ती वनडेत आपला जलवा दाखवताना दिसत आहे. आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये पहिल्यांदाच ती दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. या सर्वोच्च रँकिंगमध्ये सुधारणा करून ती लवकरच नंबर वनचा ताजही मिरवताना दिसेल. सध्याच्या रँकिंगमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील कामगिरीचा समावेश नाही.
स्मृती मानधनाला फटका
भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना सध्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरताना दिसली आहे. याचा तिला वनडे रँकिंगमध्ये फटका बसला आहे. रँकिंगमधील एका स्थानाच्या घसरणीसह ती ७०५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. किवी संघाची कॅप्टन सोफी डिव्हाइन तीन स्थानांच्या सुधारणेसह आठव्या स्थानावर पोहचली आहे.