ICC Test Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नव्या कसोटी क्रमवारीत रिषभ पंतनं आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. दुसरीकडे यशस्वी जैस्वालला थोडा फटका बसल्याचे दिसून येते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अवस्था तर खूपच बिकट दिसत असून ही जोडी टॉप १० पासून आणखी दूर गेली आहे.जो रूट अव्वलस्थानी कायम; भारत दौऱ्याला मुकला तरी केन विलियम्सन दुसरा
कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट ९०३ रेटिंगसह अव्वलस्थान कायम टिकवून आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत केन विलियम्सनचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात ८०४ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये मोठे अंतर असल्याचे दिसून येते. पण केनसाठी चांगली गोष्ट ही की, भारत दौऱ्याला मुकल्यावरही तो दुसऱ्या स्थानी टिकून आहे. नव्या क्रमवारीत इंग्लंडचा बॅटर हॅरी ब्रूक याने एका स्थानांनी सुधारणा करत तिसरे स्थान पटकावले आहे.
यशस्वीला जैस्वालची घसरण
यशस्वी जैस्वाल याला न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. याचा त्याला फटका बसला असून तिसऱ्या स्थानावर चौथ्या स्थानावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात ७७७ रेटिंग पॉइंट्स आहेत. स्टीव्ह स्मिथ ७५७ रेटिंग पॉइंटसह पाचव्या स्थानावर असून त्याच्या पाठोपाठ भारतीय विकेट किपर बॅटर रिषभ पंतचा नंबर लागतो.
पंतने घेतली मोठी झेप
मुंबईतील कसोटी सामन्यात रिषभ पंतने दमदार कामगिरी केली होती. यासह त्याने आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमावारीत पाच स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात ७५० रेटिंग पॉइंट्स आहेत. यशस्वी आणि पंत सोडला तर भारताचा अन्य कोणताही फलंदाज टॉप १० मध्ये दिस नाही.
विराट-रोहितचं काय?
कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत विराट कोहली ८ स्थानांनी घसरला आहे. त्याच्या खात्यात ६५५ रेटिंग पॉइंट्स असून तो २२ व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा तर ६२९ रेटिंग पॉइंटसह २६ व्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते. टॉप टेनमध्ये परतण्यासाठी या दोघांना दमदार कमबॅकची गरज आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यात ते यशस्वी ठरणार की, आणखी गोत्यात येणार ते पाहण्याजोगे असेल.