दुबई : आयसीसीने नुकतीच आपली कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये भारतासह कर्णधार विराट कोहली हे अव्वल स्थानावर असल्याचे दिसत आहे.
भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता. या विजयाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला 116 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.
इंग्लंडमध्ये कोहलीची बॅट चांगलीच तळपली होती. पण तो फॉर्म कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये दाखवता आला नाही. पण तरीही कोहलीने कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीच्या खात्यात सध्या 922 गुण आहेत. या यादीमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार दुसऱ्या स्थानावर असून तो कोहलीपेक्षा 25 क्रमाकांनी पिछाडीवर आहे. या यादीमध्ये भारताच्या चेतेश्वर पुजाराने तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सर्वाधिक 521 धावा या पुजाराच्या नावावर होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा यष्टीरक्षक रिषभ पंतनेही चांगली फलंदाजी केली होती. या फलंदाजीच्या जोरावर पंतने फलंदाजांच्या यादीमध्ये 17वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा रवींद्र जडेजा पाचव्या आणि आर. अश्विन नवव्या स्थानावर आहे.