Join us  

एकटा टायगर! आर अश्विनला ICC कडून मिळाली गूड न्यूज; शतकाने विराट कोहलीचंही नशीब बदललं

भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत २-१ असा विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाला सलग चौथ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 2:27 PM

Open in App

भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत २-१ असा विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाला सलग चौथ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले. या मालिकेतील कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंनी ICC Men’s Test Player Rankingsमध्ये मोठी झेप घेतलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत १७.२८च्या सरासरीने २५ विकेट्स घेऊन प्लेअर ऑफ दी सीरिज ठरलेल्या आर अश्विनने ( R Ashwin) कसोटी क्रमवारीत नंबर १ स्थानावर पुन्हा कब्जा केला. इंग्लंडचा जेम्स अँडरसन संयुक्तपणे नंबर १ गोलंदाज होता, परंतु आता अश्विन एकटा टायगर राहिला आहे.  

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या कसोटीत विराट कोहलीने शतकी खेळी करून १२०५ दिवसांचा दुष्काळ संपवला आणि आयसीसी क्रमवारीत त्याला त्याचा फायदा झाला. माजी कर्णधाराने ७ स्थानांची झेप घेताना १३ वा क्रमांक पटकावला आहे. कोहलीने अहमदाबाद कसोटीत १८६ धावांची खेळी केली आणि ती कसोटी ड्रॉ राहिली. अपघातानंतर उपचार घेत असलेला रिषभ पंत फलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या आणि कर्णधार रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे. अक्षर पटेलनेही या मालिकेत फलंदाजीत दम दाखवला आणि ८ स्थानांच्या सुधारणेसह ४४वे स्थान पटकावले. अष्टपैलू खेळाडूंमध्ये तो १ स्थान वर सरकला असून चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने चार सामन्यांच्या मालिकेत २६४ धावा केल्या.  

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही लक्षवेधी झेप घेतली आहे. अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा याने या मालिकेत ३३३ धावा केल्या आणि दोन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर पोहोचला. अष्टपैलू कॅमेरून ग्रीन २६व्या स्थानावरून थेट ११व्या क्रमांकावर आला. ट्रॅव्हीस हेडनेही पाचवे स्थन कायम राखले आणि त्याने कारकीर्दित सर्वोत्तम ८५३ रेटिंग गुणांची कमाई केली. श्रीलंका आणि न्यूझीलंड मालिकेनंतर काही बदल पाहायला मिळाले आहेत. किवी कर्णधार टीम साऊदी सहा स्थानांच्या सुधारणेसह १२व्या क्रमांकावर आला आहे. डॅरील मिचेल फलंदाजांत ८व्या स्थानावर आला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

  

टॅग्स :आयसीसीआर अश्विनविराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App