ICC ODI World Cup 2023 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंड आणि भारत हे दोनच संघ अपराजित आहेत. भारताच्या अजिंक्य प्रवासात अनुभवी स्टार विराट कोहली ( Virat Kohli) याने स्पर्धेच्या पहिल्या १३ दिवसांमध्ये मैदानात सर्वात मोठा प्रभाव पाडला आहे. कोहलीने भारतासाठी तीन सामन्यांमध्ये एकूण तीन झेल घेतले आहेत. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी डेव्हिड वॉर्नर यांच्यापेक्षा २ झेल जरी विराटने कमी घेतले असले तरी मैदानावरील त्याचा प्रभाव त्यांच्यापेक्षा जास्त राहिल आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व संघांचे ३ सामने झाले आहेत आणि सामन्यांद्वारे वाचवलेल्या धावा व प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्याच्या रेटिंगच्या यादीत विराट अव्वल स्थानावर आहे आणि त्याच्या एकूण २२.३० गुणांमुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेत क्षेत्ररक्षणाच्या प्रभावासाठी अव्वल स्थानावर आहे. कोहलीला या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट ( ४ झेल) आणि वॉर्नर ( ५ झेल) यांच्याकडून कडवी टक्कर मिळतेय.
पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताचे प्रत्येकी दोन खेळाडू टॉप १० मध्ये आहेत, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा ११व्या स्थानावर आहे. भारताने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये केवळ दोन झेल सोडल्याची नोंद आहे, विद्यमान चॅम्पियन इंग्लंडने ( १ ) कमी झेल सोडले आहेत. टीम इंडिया आतापर्यंत स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात त्यांच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला 'सुवर्ण पदक' देत आहेत. पहिल्या सामन्यात पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर कोहलीला हा पुरस्कार दिला गेला होता. अष्टपैलू शार्दूल ठाकूरला अफगाणिस्तानविरुद्धच्या आणि केएल राहुलला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीनंतर सुवर्णपदक दिले गेले होते.