Join us  

T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम

शाहीन शाह आफ्रिदीने तीन स्थानांनी झेप घेत अकरावे स्थान गाठले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 7:00 PM

Open in App

T20 World Cup 2024 : न्यूझीलंड, आयर्लंड आणि आता इंग्लंडविरूद्ध मालिका खेळत असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत चांगली झेप घेतली. स्फोटक खेळीसाठी ओळखला जाणारा फखर झमानने ६ स्थानांनी झेप घेऊन ५१ व्या स्थानी आला आहे. शाहीन शाह आफ्रिदीने तीन स्थानांनी झेप घेत अकरावे स्थान गाठले. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत इमाद वसीम १२ व्या स्थानी आला आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम हे फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या आधी पाकिस्तानने तीन द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत. भारतात आयपीएलचा थरार सुरू असताना शेजारील देशाने न्यूझीलंड, आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० विश्वचषकाची तयारी केली. 

भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचा फिल साल्ट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा हसरंगा प्रथम स्थानी आहे, तर बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन सामने रद्द करावे लागले. एक सामना जिंकून यजमान इंग्लिश संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना निर्णायक असेल. 

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाबखान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

पाकिस्तानच्या सामन्यांचे वेळापत्रक :६ जून – अमेरिका विरुद्ध, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, डॅलस९ जून – भारत विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क११ जून - कॅनडा विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क१६ जून – आयर्लंड वि. सेंट्रल ब्रोवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा. 

टॅग्स :पाकिस्तानआयसीसीसूर्यकुमार अशोक यादवटी-20 क्रिकेटबाबर आजम