ICC T20 Rankings: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्यासाठी विक्रम मोडणे हा सवयीचा भाग झाला आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 क्रमवारीत बाबरने अव्वल स्थान पटकावताना मोठा विक्रम मोडला. बाबरचा प्रत्येक नवा विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या मक्तेदारीला आव्हान देणारा ठरला आहे. आयसीसीच्या ट्वेंटी-20 क्रमवारी जाहीर झाल्यानंतर बाबरने विराटचा आणखी एक विक्रम मोडला. आयसीसी ट्वेंटी-20 फलंदाजांमध्ये सर्वाधिक दिवस अव्वल स्थानावर राहण्याचा मान आता बाबरने पटकावला आहे. तो 1014 दिवस या क्रमांकावर कायम राहिला आहे आणि विराटचा 1013 दिवसांचा विक्रम मोडला गेला आहे.
बाबर 818 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि पाकिस्तानचाच मोहम्मद रिझवान 24 गुणांच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानच्या खात्यात 794 गुण आहेत. अव्वल 10 फलंदाजांमध्ये इशान किशन ( 682) हा एकमेव भारतीय 7व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम ( 757), इंग्लंडचा डेवीड मलान ( 728), ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( 716) व न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे ( 703) हे 3 ते 6 व्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेचा पथूम निसंका 8व्या, न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील 9 वा आणि आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेर ड्युसेन 10व्या क्रमांकावर आहेत.
बाबर केवळ ट्वेंटी-20 क्रिकेटमध्येच नव्हे, तर वन डेतही अव्वल आहे. वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतकं दोन वेळा करणारा तो पहिला फलंदाज आहे. कसोटीतही अव्वल स्थानावर झेप घेण्याची बाबरची तयारी आहे आणि सध्या तो 815 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.