आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या क्रमवारीमध्ये भाराताचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा या दोघांनाही जोरदार धक्के बसले आहेत.
सध्याच्या घडीला कोहली हा चांगल्या फॉर्मात दिसत नाही. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताने न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकली होती. पण त्यानंतरही कोहली आणि रोहित या दोघांनाही आयसीसीच्या क्रमवारीत धक्का बसला आहे. पण या क्रमवारीत लोकेश राहुलने मात्र चांगले स्थान पटकावले आहे.
आयसीसीने नुकतीच आपली क्रमवारी जाहीर केली आहे. रविवारी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका संपली. त्यानंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या मालिकेत कोहली आणि रोहित या दोघांना धक्का बसला आहे, पण इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने मात्र टॉप टेनमध्ये प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले आहे.
या फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण त्यानंतरचे दुसरे स्थान भारताचा सलामीवीर लोकेळ राहुलने पटकावले आहे. लोकेश राहुल सध्या चांगल्या फॉर्मात आहे. राहुलकडे भारतीय संघाने यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर राहुलच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राहुलला कधी सलामी तर कधी मधल्या फळीत फलंदाजीला पाठवले होते. पण राहुलने प्रत्येक स्थानावर दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
या क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने मात्र टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. पण हा प्रवेश करताना त्याने रोहितला मोठा धक्का दिला आहे. यापूर्वी रोहित हा दहाव्या स्थानावर होता. आता मॉर्गनने नववे स्थान पटकावल्यामुळे रोहित टॉप टेनमधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे रोहितपाठोपाठ कोहलीलाही धक्का बसला आहे.
मॉर्गनने नववे स्थान पटकावत कोहलीला दहाव्या स्थानावर ढकलले आहे. यापूर्वी कोहली हा क्रमवारीत नवव्या स्थानावर होता. पण आता कोहलीची दहाव्या स्थानावर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.