Yashasvi Jaiswal Shubman Gill, ICC T20 Rankings: वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताची पहिली क्रिकेट मालिका झिम्बाब्वे विरूद्ध होती. या मालिकेत भारताने आपला युवा संघ पाठवला होता. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेत पहिला सामना हरला पण त्यानंतर सलग चारही सामने जिंकले. त्यामुळे भारताने ४-१ ने मालिका जिंकली. या मालिकेत दमदार कामगिरी करणारे शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनाही ताज्या ICC टी२० क्रमवारीत बढती मिळाली आहे.
यशस्वी जैस्वालने या मालिकेत केवळ ३ सामन्यात फलंदाजी केली पण तरीही तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता. त्याने ३ सामन्यांत ७०.५० च्या सरासरीने आणि १६५ च्या स्ट्राइक रेटने एकूण १४१ धावा केल्या. तिसऱ्या टी२० मध्ये त्याने ३६ धावा केल्या तर चौथ्या टी२० मध्ये नाबाद ९३ धावा कुटल्या. त्या मॅचमध्ये त्याला सामनावीराचा किताब मिळाला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला चार स्थानांची बढती मिळाली असून तो ७४३ रेटिंग पॉईंट्ससह सहाव्या स्थानी आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यावरील भारताचा कर्णधार शुबमन गिल यानेही मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. पण पुढील सामन्यांमध्ये त्याने दमदार फटकेबाजी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल होता. त्याने १७० धावा केल्या. शुबमन गिलने ३६ स्थानांची उडी घेतली आणि तो ३७व्या स्थानी विराजमान झाला. गिलच्या नावे सध्या ५३३ रेटिंग पॉइंट्स आहेत. दरम्यान, सूर्यकुमार यादव हा टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड हा पहिल्या स्थानावर आहे.