- बाळकृष्ण परब
नेहमी एक गोड स्वप्न मनाशी बाळगावं आणि ते पूर्ण होणार असं वाटत असतानाच काही तरी अघटित घडून स्वप्नभंग व्हावा, तसं अब्जावधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या बाबतीत मागच्या दहा वर्षांपासून सुरू होतं. वनडे, कसोटी आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारच्या जागतिक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत वारंवार अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारूनही विजेतेपद हुलकावणी देत होतं. अगदी सहा-सात महिन्यांपूर्वी घरच्या मैदानावर झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातही अशाच अनपेक्षित अपयशाचा सामना टीम इंडियाला करावा लागला होता, त्यामुळे निराशा अधिकच वाढली होती. मात्र शनिवारची रात्र विश्वविजेतेपदाच्या शिखरापर्यंत पोहोचून ते सर करण्यात भारतीय संघाला अनेकदा अपयश आल्याने हताश, निराश आणि उदास झालेल्या क्रिकेटप्रेमींसाठी स्वप्नपूर्तीचा अविस्मरणीय क्षण घेऊन आली.
बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन येथे झालेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या, रोमांचक, रोमहर्षक अशा शब्दांनी क्रिकेटच्या इतिहासात नोंद झालेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर अवघ्या ७ धावांनी मात केली आणि १४० कोटी भारतीयांनी विश्वविजेतेपदाची कधीही विसरता न येणारी रात्र अनुभवली. तब्बल तेरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयसीसीच्या जागतिक स्पर्धेचं विश्वविजेतेपद भारताला मिळालं, रोहित शर्माने बार्बाडोसच्या मैदानात विजयाचा तिरंगा रोवत अगदी थाटात टी-२० वर्ल्डकप उंचावला आणि देशभरात ऐन पावसाळ्यात दिवाळी साजरी झाली.
या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाने केलेली कामगिरी ही अनेक वर्षे लक्षात राहील अशीच झाली. कारण अनेक आव्हानं आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळालंय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा सर्वोत्तम संघ होता का? सांगता येत नाही. कारण टी-२० वर्ल्ड कपसाठी जेव्हा या संघाची निवड झाली तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. रोहितला कर्णधार का केलं? पांड्याला संघात का घेतलं? युवा खेळाडूंना संधी देण्याऐवजी अनेक वयस्कर खेळाडूंना संघात का घेतलं? असं वारंवार विचारलं जात होतं. सध्या भारतात क्रिकेट म्हणजे आयपीएल अशीच धारणा झालेली असल्याने हे प्रश्न रास्तही होते. पण भारतीय संघानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेस्ट इंडीज आणि अमेरिकेतील मैदानामधून दिली.
तसं पाहायला गेलं तर, या वर्ल्ड कपमध्ये आपल्या संघाची सुरुवात ही अपेक्षेनुरूप झाली नव्हती. सुपर ८ मधील अमेरिकेविरुद्धच्या सामान्यांपर्यंत आपण अडखळत होतो. पण बांगलादेशविरुद्धच्या लढतीनंतर आपण टॉप गिअर टाकला आणि पुढे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका अशा दणकट संघांचा पाडाव करत मागच्या दहा वर्षांत सातत्यानं हुलकावणी देत असलेलं विश्वविजेतेपद पटकावलं.
भारतीय संघाच्या या टी-२० विश्वविजेतेपदाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ हा कुठल्याही एका खेळाडूवर अवलंबून असल्याचं दिसलं नाही. प्रत्येक सामन्यात कुणी ना कुणी उभा राहिला आणि संघाच्या गरजेनुसार खेळून विजय सुकर केला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रिषभ पंतच्या समयोजित फलंदाजीनंतर बुमराह, अक्षरदीप, पांड्याने अनपेक्षित असा विजय शक्य करून दाखवला. तर सुपर ८ मध्ये नवख्या अमेरिकेने अडचणीत आणलं असताना सूर्यकुमारने मॅच विनिंग खेळी केली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी बजावली.
मात्र या संपूर्ण स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीला कलाटणी देणारा सामना होता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा. गतवर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाच्या कटू आठवणी ताज्या असताना ही लढत झाली. अन् त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने टीम इंडिया या लढतीत खेळली. विशेषत: कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात विस्फोटक खेळी करताना कांगारूंची जी धुलाई केली. त्यामुळे भारतीय संघाचं मनोधैर्य कमालीचं उंचावून एक सकारात्मक वातावरणनिर्मिती झाली. रोहितच्या या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा फायदा पुढील उपांत्य आणि अंतिम सामन्यातही भारतीय संघाला झाला. इंग्लंडविरुद्धची उपांत्य लढत सुद्धा तशी आव्हानात्मक होती. त्यात मागच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवाच्या कटू आठवणीही होत्या. मात्र, यावेळी टीम इंडियाने इंग्लंडला कुठलीही संधी दिली नाही. फलंदाजीत रोहित, सूर्यकुमार, हार्दिक पांड्या यांनी दिलेल्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी आपलं काम चोख पार पाडलं आणि संघाला फायनलमध्ये नेलं.
आता अंतिम सामन्याबाबत बोलायचं झाल्यास त्या लढतीत काय घडलंय, तो आता इतिहास बनलाय. क्रिकेटमध्ये कितीही मेहनत केली तरी शेवटी नशिबाची साथ महत्त्वाची ठरत. या सामन्यात नाणेफेकीच्या कौलापासून ते मिलरच्या विकेटपर्यंत नशिबाने आपल्याला चांगलीच साथ दिली. पण हे यश केवळ नशिबाच्या जोरावर साध्य झालेलं नाही. प्रथम फलंदाजी घेतल्यावर संपूर्ण स्पर्धेत आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीने दमदार सुरुवात केली. आता धावांचा विराट ज्वालामुखी फुटणार असं वाटत असतानाच दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा आणि रिषभ पंत केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने भारतीय संघ आता वनडे वर्ल्डकपच्या फायनल प्रमाणे घालीन लोटांगण करतो की, काय अशी शंकेची पाल चुकचुकून गेली. मात्र विराटचा इरादा वेगळाच दिसला. त्याने शेवटपर्यंत भारतीय फलंदाजीचे सुकाणू आपल्या हाती ठेवत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी त्याला दिलेली साथही महत्त्वाची होती.
खरं तर, आजच्या टी२० च्या जमान्यात १७६ ही काही फार मोठी धावसंख्या नाही. पण या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची गोलंदाज दर्जेदार झालेली असल्याने आपण या धावसंख्येचा बचाव करू शकतो, असं वाटत होतं. पण ठरावीक अंतराने विकेट पडत असल्या तरी आफ्रिकन संघाने आव्हानाचा टिच्चून पाठलाग केला. अक्षर पटेलने टाकलेल्या पंधराव्या षटकात क्लासेनने २४ धावा चोपून सामना जवळपास संपवलाच होता. आणखी एक वर्ल्डकप हातून निसटला, अशी भावना कोट्यवधी भारतीयांच्या मनात निर्माण झाली होती.
३० चेंडूत ३० धावा असं समीकरणं होतं. पराभव समोर दिसत होता. मात्र नंतरच्या ३० मिनिटांमध्ये जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्या यांना जे काही केलं, त्याच्या आठवणी हा सामना ज्यांनी पाहिलाय, ते आपल्या पुढच्या पिढ्यांना अगदी रंगवून सांगतील. सतराव्या षटकात पांड्याने स्फोटक फलंदाजी करत असेलेल्या क्लासेनची विकेट घेतली आणि भारतीय संघासाठी बंद झालेले विश्वविजेतेपदाचे दरवाजे काहीसे किलकिले केले. मग बुमराह आणि अर्शदीपने पुढच्या दोन षटकांत आफ्रिकेला एकेका धावेसाठी झगडायला लावले. त्यामुळे चेंडूला धाव असं असलेलं समिकरण आफ्रिकेसाठी शेवटच्या ६ चेंडूत १६ धावा असं बदललं. पण समोर डेव्हिड मिलर असल्याने आफ्रिकन संघाला चमत्काराची आशा होती. मिलरने मारलेल्या उत्तुंग फटका सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल पकडला आणि अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टी-२० वर्ल्डकप भारताच्या झोळीत पडला. सोबतच कोट्यवधी भारतीयांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नाची पूर्तताही झाली. या विजयामुळे जागतिक क्रिकेटमधील भारतीय संघाचा दबदबा पुन्हा एकदा प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कठीण काळात एक वेळ जेव्हा सर्व काही संपलंय. असं वाटेल तेव्हा अजिबात हिंमत हरू नका. संघर्ष करा, शेवटपर्यंत प्रयत्न करा, यश तुम्हालाच मिळेल. हे टीम इंडियानं या फायनलमध्ये दाखवून दिलंय, ही गोष्टही कायम लक्षात राहील.
Web Title: ICC T20 WC 2024 Final, Ind Vs SA: A Faith-Boosting World Cup! When the sweet dream of the country comes true...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.