दुबई - पाकिस्तानच्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक असलेला शोएब मलिक वयाच्या चाळीशीमध्येही तुफानी फलंदाजी करत आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकामध्येही मलिकने धकाडेबाज खेळी केल्या आहेत. रविवारी स्कॉटलंडविरुद्ध झालेल्या लढतीत मलिकने १८ चेंडूत ५४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीमध्ये मलिकने ६ षटकार आणि एक चौकार मारला. दरम्यान, शोएबच्या या खेळीनंतर त्याची पत्नी सानिया मिर्झा हिची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
पाकिस्तान आणि स्कॉटलंडमध्ये झालेला सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी सानिया मिर्झा हीसुद्धा तिच्या मुलासह उपस्थित होती. तसेच शोएब मलिकच्या प्रत्येक फटक्यानंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. दरम्यान, आता सानियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शोएब मलिकने टी-२० विश्वचषकामध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्यामध्ये भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याची बरोबरी केली आहे. लोकेश राहुलनेसुद्धा स्कॉटलंडविरुद्ध १८ चेंडूत ५० धावा फटकावल्या होत्या. मलिकने पाकिस्तानच्या डावातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले होते.
त्याने शेवटच्या षटकात तीन षटकार आणि एक चौकार मारला. दरम्यान, या खेळीबरोबरच शोएब मलिक टी-२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक फटकावणारा पाकिस्तानचा फलंदाज बनला आहे. त्याने उमर अकमलचा वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडला. त्याने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ आणि २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक फटकावले होते. शोएब मलिकने स्कॉटलंडविरुद्ध याआधीही जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने २०१८ मध्ये २७ चेंडूत ५३, २०१८ मध्येच २२ चेंडूत ४९ आणि आता शारजामध्ये १८ चेंडूत ५४ धावा ठोकल्या आहेत.